काँग्रेसने दगाफटका करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा लोकसभा निवडणुकीत  पराभव केला होता, मात्र श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी डॉ. आंबेडकर यांना सन्मानपूर्वक राज्यसभेची उमेदवारी दिली होती. आठवले यांना उमेदवारी देऊन भाजपने या इतिहासाची पुनरावृत्ती केल्याचा दावा भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी सोमवारी केला. तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वचनाची आम्ही पूर्तता केली हे सांगत आठवले यांच्या उमेदवारीवरून शिवसेनेवर कुरघोडी करण्याची संधीही मुंडे यांनी साधली.
भाजपच्या केंद्रीय समितीने मंजुरी दिल्यावर भाजपच्या कोटय़ातील राज्यसभेच्या जागेवर आठवले यांच्या उमेदवारीची घोषणा मुंडे यांनी प्रदेश कार्यालयात केली. या वेळी आठवले, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे आदी नेते उपस्थित होते. ही घोषणा होताच रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी व घोषणाबाजी केली. या वेळी मुंडे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १९५२ व ५४ मध्ये काँग्रेसने दोन वेळा संगनमत करून लोकसभा निवडणुकीत पाडले. त्या वेळी श्यामाप्रसाद मुखर्जीनी त्यांना पश्चिम बंगालमधून राज्यसभेवर पाठविले.
आठवले यांनाही शिर्डी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने दगाफटका करून पाडले व अपमानित केले. भाजपने मात्र इतिहासाची पुनरावृत्ती करीत आठवले यांना सन्मानित केले असून, त्यांना एनडीएमध्ये घटकपक्ष म्हणून स्थान देण्यात आले आहे. सत्ता मिळाल्यावर सत्तेतही सहभागी करून घेतले जाईल. सामाजिक परिवर्तन घडविणारा हा निर्णय आहे.
राज्यसभेची उमेदवारी दिल्याने आनंद व्यक्त करताना आठवले यांनी एनडीएला सत्ता मिळाल्यावर केंद्र व राज्य सरकारमध्ये रिपब्लिकन पक्षाला सत्तेत वाटा मिळावा, अशी मागणी केली.
जावडेकर यांना तूर्तास खासदारकी नाही
भाजपच्या कोटय़ातून रामदास आठवले यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आल्याने विद्यमान खासदार प्रकाश जावडेकर यांना अन्य राज्यांमधून सामावून घेण्याचा प्रयत्न होता. पण अन्य कोणत्याही राज्यातील भाजपच्या नेतृत्वाने फारशी अनुकूलता न दर्शविल्याने अखेर जावडेकर यांना काही काळ राज्यसभेची खासदारकी मिळणार नाही. आगामी निवडणुकीनंतर काही जागा रिक्त होण्याची शक्यता आहे. तेव्हा जावडेकर यांना राज्यसभा देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

Story img Loader