उमाकांत देशपांडे
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप २४० जागा लढणार असून शिंदे गटाकडे ५० हून अधिक जागा लढण्यासाठी नेतेच नाहीत, असे युतीतील जागावाटपाबाबत संयम न ठेवता वक्तव्य केल्याने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लगेच सारवासारव करावी लागली. चंद्रकांत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष असताना केलेल्या अनेक वक्तव्यांमुळे भाजपची पंचाईत झाली, तशीच वेळ बावनकुळे यांच्या वक्तव्यामुळे यावेळी भाजपवर आली.
पक्षाचे प्रवक्ते, समाजमाध्यमे आणि प्रसिद्धीमाध्यमे पदाधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत शुक्रवारी बोलताना बावनकुळे यांनी भाजप २४० जागा लढविणार असल्याचे सांगून पदाधिकाऱ्यांनी रात्रंदिवस काम करीत निवडणूक तयारीला लागावे, अशा सूचना दिल्या. त्यांचे भाषण समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आले होते.
भाजप २४० जागा लढणार असल्याने शिंदे गटाला ४८ जागाच मिळतील, असा वक्तव्याचा अर्थ काढला गेला आणि शिंदे गटाकडूनही भाजप नेत्यांकडे नाराजी व्यक्त करण्यात आली. जागावाटपाच्या अंतिम चर्चा झाल्या नसताना अकारण त्याचे सूत्र खुद्द प्रदेशाध्यक्षांनीच जाहीर केल्याने ही बाब पक्षश्रेष्ठींपर्यंत गेली. त्यांनीही नाराजी व्यक्त केल्याने युतीतील जागावाटप झालेच नसल्याची सारवासारव बावनकुळेंना रात्रीच करावी लागली.