मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय तर्फे रौप्य महोत्सवी सांगता समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, लेखक भालचंद्र नेमाडे यांनी खळबळजनक वक्तव्यांची मालिका उद्धृत केली. सध्या वादात असलेल्या औरंगजेब, ज्ञानव्यापी मशीद अशा विषयांना त्यांनी हात घातला. यानंतर आता नेमाडे यांच्यावर टिकेची झोड उठली असून अनेक स्तरातून त्यांच्या वक्तव्याचा विरोध होत आहे. तसेच राज्याचे मंत्री गिरीश महाजन म्हणाले, “त्यांचे वय झाले असून ते चुकीचा इतिहास सांगत आहेत. हे सहन करण्यापलीकडे आहे.”
भालचंद्र नेमाडे काय म्हणाले?
भालचंद्र नेमाडे यांच्या भाषणाच्या व्हिडीओ क्लिप्स आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांच्या ऐकूण भाषणावरच आक्षेप घेण्यात आलेले असले तरी औरंगजेबाने सतीप्रथा बंद केली असल्याच्या दाव्यावर अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “सतीप्रथा बंद करणारा औरंगजेब पहिला राजा होता”, असे विधान त्यांनी केले. तसेच या विधानानंतर सध्या महिला-मुलींवर जे अत्याचार होत आहेत. लाखो मुली दरवर्षी बेपत्ता होत आहेत, याचा उल्लेख करून हे सहन करण्यापलीकडे असल्याचे सांगितले.
गिरीश महाजनांनी काय म्हटले?
“भालचंद्र नेमाडे हे ज्येष्ठ साहित्यिक आहेत. पण त्यांनी हा चुकिचा इतिहास कुठून आणला समजत नाही. औरंगजेबाच्या पत्नी पळवल्या म्हणून त्यांनी मंदिरांची तोडफोड केली किंवा औरंगजेबाने सतीप्रथा बंद केली. या गोष्टी कुठून आणल्या. वयोमानानुसार तुम्ही काहीही बोलावे, हे सहन करण्यापलीकडचे आहे.”, अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
एकाबाजूला भालचंद्र नेमाडे यांनी मुंबई मराठी ग्रंथालयाच्या कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य केले असताना शरद पवारदेखील मंचावर उपस्थित होते. मात्र त्यांनी आपल्या भाषणात व्यासपीठासा साजेसे भाषण करत असताना ग्रंथालयाची चळवळ आणि ही संस्था मागच्या १२५ वर्षांपासून कशापद्धतीने काम करत आहे, याचा ऊहापोह केला.
शिवसेना शिंदे गटाकडूनही नेमाडेंचा निषेध
शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजीव भोर पाटील यांनीही नेमाडे यांचा निषेध व्यक्त केला आहे. शहाजीराजे भोसले यांच्या निधनानंतर राजमाजा जिजाऊ या सती गेल्या नाहीत. अशी अनेक उदाहरणे इतिहासात पाहायला मिळतात. पण या सामाजिक कार्याचे श्रेय औरंगजेबाला देणे चुकीचे आहे. प्रकाश आंबेडकर आणि भालचंद्र नेमाडे यांच्यासारखे लोक औरंगजेबाचे उदात्तीकरण करत असून आताच याबाबतची वक्तव्ये का होत आहेत? याचा तपास करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.