कन्हैया कुमारवर ठेवण्यात आलेला राष्ट्रविरोधी हा ठपका चुकीचा असून सरकारच्या भूमिकेमुळेच कन्हैयाची छबी मोठी झाली आहे, अशी टीका करणाऱ्या शिवसेनेला सोमवारी भाजपकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले. कन्हैयासारखे तरूण ही देशाचे भवितव्य घडविणारी शक्ती असून केंद्र सरकार अशा तरूणांना मार्गदर्शन करण्याऐवजी चुकीच्या मार्गावर नेत असल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाशिक येथे बोलताना केला होता. मात्र, देशद्रोही आणि दहशतवाद्यांचे समर्थन करणाऱ्या शिवसेनेला कन्हैयाचे विचार इतकेच भावत असतील तर सेनेने कन्हैयाला व त्यांच्या मित्रांना शाखाप्रमुख करावे. म्हणजे जनतेलाही सेनेचा राष्ट्रवाद कळेल, असा टोला लगावत भाजपने सेनेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेना ही आता बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना राहिलेली नाही. दहशतवाद्यांचा जयजयकार करणाऱ्यांची बाजू घेण्याची वेळ शिवसेनेवर आली असेल तर शिवसेना बदलली आहे का, याचे आत्मचिंतन शिवसेना पक्षप्रमुखांनी करायला हवे, असे भाजप आमदार गिरीश व्यास यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
पाकिस्तानचा गळा दाबण्याची हिंमत दाखवणार ?; सेनेचा भाजपला सवाल 
सत्ता स्थापनेपासून विरोधकांच्या भूमिकेत वावरणाऱ्या सेनेने गेल्या काही दिवसांत दुष्काळ आणि पाणी टंचाईच्या मुद्द्यावरून मित्रपक्ष असलेल्या भाजपला सुनाविण्याची एकही संधी सोडलेली नाही. मात्र, काल नाशिक येथे झालेल्या तरूण कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी कन्हैयाला चुकीच्या पद्धतीने देशद्रोहाचे लेबल लावण्यात आल्याचे सांगत भाजपवर टीकेचे आसूड ओढले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा