मधु कांबळे, लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे सरकारच्या मागील दीड वर्षांच्या कार्यकाळात सांस्कृतिक कार्य विभागाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या नावाने आयोजित केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांवर २७५ कोटी, ११ लाख ४ हजार ९३६ रुपये इतका खर्च केला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून  भाजपचा हिंदूत्ववादी धार्मिक अजेंडाही राबविण्यात आल्याचे दिसते. विशेष म्हणजे राज्यात जी-२० परिषदा व संसदीय स्थायी समितीच्या दौऱ्याच्या वेळीही मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करून, त्यावरही मुक्त हस्ते खर्च करण्यात आल्याचे माहिती अधिकारातील कागदपत्रांवरून स्पष्ट होते.

राज्यात मागील दीड वर्षांत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन व त्यावर मुक्त हस्ते खर्च करण्याचा धडाका लावला आहे. त्यापैकी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने राज्यात विविध भागात व विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. केंद्र सरकारने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा कालावधी १२ मार्च २०२१ ते १५ ऑगस्ट २०२३ असा दिला आहे. सांस्कृतिक कार्य विभागाने ११ ऑगस्ट २०२२ रोजी प्रसृत केलेल्या शासन आदेशातच तसा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे कार्यक्रम अजून सुरू आहेत. राज्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांवर मागील दीड वर्षांत ६११ कोटी ९४ लाख ६० हजार ६५३ रुपये जो खर्च झाला आहे, त्यापैकी २७५ कोटी ११ लाख ४ हजार ९३६ रुपये इतका खर्च केवळ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या नावाने आयोजित केलेल्या कार्यक्रमावर झाला आहे.

हेही वाचा >>> “शपथ पूर्ण केलीत, मग आता…”, छगन भुजबळांचा थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त काही धार्मिक किंवा धर्माशी संबंध जोडला जाणाऱ्या कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले. त्यापैकी ‘गंगा नदी महती’ असा एक कार्यक्रम आहे. या नावाने तीन कार्यक्रम करण्यात आले असून, त्यावर १ कोटी ७८ लाख १७ हजार ९९० रुपये खर्च झाल्याचे दाखविण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त तयार करण्यात आलेल्या साडेतीन शक्तीपीठ रथाचे नंतर महाराष्ट्रातील सर्व शक्तीपीठांवर प्रदर्शन करण्यात आले, त्यावर १ कोटी १३ लाख २० हजार रुपये खर्च झाला. चंद्रपूरला महाकाली यात्रेनिमित्त संगीत कार्यक्रम घेण्यात आला, त्यासाठी १ कोटी रुपये खर्च करण्यात आला. मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे नुकताच रामायणावर आधारित महाकाव्य महोत्सव असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी लागणाऱ्या ३ कोटी ५० लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आली. चंद्रपूरमध्ये भगवान श्रीराम यांचे अयोध्या नगरीत आगमन अशा चित्ररथाची निर्मिती व प्रदर्शनावर ४१ लाख ८ हजार रुपये खर्च दाखविण्यात आला.

मुनगंटीवार यांच्याकडून समर्थन 

* जुलै २०२३ मध्ये संसदीय स्थायी समितीचा मुंबई दौरा होता. समितीच्या सदस्यांसाठी हॉटेल ट्रायडंट येथे  महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख करून देणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी १२ लाख ५० हजार रुपये खर्च आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

* ६ जुलै रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचाही मुंबई दौरा होता. राज भवनात त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळीही आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमावरील  २४ लाख ७० हजार रुपये खर्चास मान्यता देण्यात आली आहे. * विशेष म्हणजे हे दोन्ही कार्यक्रम स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत आयोजित करण्यात आले होते. मागील दीड वर्षांत सांस्कृतिक कार्यक्रमांवर झालेल्या खर्चाचे राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी समर्थन केले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp hindutva agenda implemented through cultural programs in maharashtra on azadi ka amrit mahotsav event zws