संजय मोहिते

चिखली : देवेंद्रजी, जनाची नाही मनाची लाज बाळगा. मी आव्हान देतो तुम्ही सत्तेत आहात ना वीजबिल माफ करा. वर वेगळी भाषा खालती उतरले की वेगळी भाषा, असे करू नका, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या कारभारावर टीका केली. बुलढाणा जिल्हयातील चिखली येथे शेतकरी संवाद मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते.

ठाकरे यांनी राज्य शासनावर  टीका करीत मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. राज्यातील शेतकरी व सामान्य जण त्रस्त असताना मुख्यमंत्री अन् खोकेबाज पुन्हा गुवाहाटीला गेले आहे. महाराष्ट्रातील देव कमी पडले म्हणून ते तिकडे नवस फेडायला गेले. कालपरवा ते ज्योतीषाकडे गेले. ज्यांचा स्वत:वर विश्वस नाही, स्वत:चे भविष्य माहीत नाही ते राज्याचे काय भले करणार असा सवाल त्यांनी केला. त्यांचे भविष्य दिल्लीत ठरणार आहे अन ते चांगले नाही हे उघड आहे.  राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आम्ही कर्जमुक्त केले, तुम्ही त्यांना विजबिलमुक्त करा, असे थेट आव्हानच त्यांनी दिले.

भाजप आता ‘आयात’ पक्ष

भाजप आज आयात पक्ष, भाकड पक्ष झाला आहे. यादी काढा मग समजेल किती आयात लोक आलेत या पक्षात. स्वत: चंद्रकांत पाटील बोलले, मनावर दगड ठेवला. आजही गद्दारांनी सांगावे आम्ही भाजपच्या तिकिटावर लढणार नाहीत. बाळासाहेब हवेत, चिन्ह हवे मग तुमची मेहनत कुठे आहे, अशा परखड सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदार व खासदारांना केला. यावेळी ठाकरे म्हणले, आम्ही ठेवलेल्या विश्वासाचा घात करून तुम्ही बेकायदेशीरपणे सत्तेत आलात. तुमच्या नावाच्या मागे पद लागतील, पण तुमच्या मस्तकावरील गद्दारीचा शिक्का काहीही केले तरी तहहयात पुसला जाणार नाही.

देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर मुंबई : काहींना जनाचीही नाही आणि मनाचीही नाही, असा घणाघात करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले. शेतकऱ्यांना मदत आणि वीजबिल माफीची मागणी करीत ठाकरे यांनी चिखली येथील मेळाव्यात राज्य सरकार आणि फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्याला फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मी जे बोलतो, ते करतो,  हवेत गप्पा मारत नाही. शेतकऱ्यांकडून चालू वीजबिल घेण्यात यावे, बिलाची थकबाकी सक्तीने वसूल करण्यात येऊ नये, याबाबत महावितरण कंपनी ने २२ नोव्हेंबर २०२२ रोजी आदेश जारी केले आहेत. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हे सरकार कटिबद्ध आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांबाबत किती पोकळ कळवळा होता, हे जनतेने २०१९-२०२२ या काळात पाहिले आहे, असा टोलाही फडणवीस यांनी ठाकरे यांना लगावला आहे.

Story img Loader