|| संतोष प्रधान

काँग्रेसकडून फोडाफोडीचा आरोप; दोघांचा शपथविधी

येत्या मंगळवारी अहमदाबादमध्ये होणाऱ्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी दोन आमदारांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आतापर्यंत चार आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून, यापैकी दोघांना मंत्रिपदे देण्यात आली. पैसा आणि सत्तेचा गैरवापर करून आमदारांची फोडाफोडी करण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या गुजरात या गृहराज्यात काँग्रेस पक्षाने कार्यकारिणीची बैठक आयोजित केली आहे. ही बैठक २८ फेब्रुवारीला होणार होती, पण सीमेवरील तणावामुळे ही बैठक लांबणीवर टाकण्यात आली होती. सोनिया गांधी, राहुल व प्रियंका गांधी आदी नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक मंगळवारी होत असतानाच भाजपने काँग्रेसच्या दोन आमदारांना फोडून काँग्रेसला मोठा धक्का दिला. जवाहर चावडा आणि पुरुषोत्तम सबारिया या दोन आमदारांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. यापैकी चावडा यांचा राज्य मंत्रिमंडळात शनिवारी सकाळी समावेश करण्यात आला.

डिसेंबर २०१७ मध्ये झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपला चांगली लढत दिली होती. परिणामी भाजपला तिहेरी आकडा गाठता आला नव्हता. काँग्रेसचे आमदार फोडून भाजपने आपले संख्याबळ वाढविण्यावर भर दिला आहे. आतापर्यंत काँग्रेसच्या चार आमदारांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. यापैकी दोघांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला.  पक्षांतर करून भाजपमध्ये प्रवेश केल्यास मंत्रिमंडळात स्थान मिळते हा संदेश भाजपने दिल्याने काँग्रेसच्या अन्य काही आमदारांमध्ये चुळबुळ सुरू झाली आहे.

मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी शनिवारी केलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात तिघांचा नव्याने समावेश करण्यात आला. यापैकी चावडा यांनी कालच काँग्रेसचा राजीनामा दिला होता. २०१७ मध्ये अहमद पटेल यांच्या राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या काँग्रेस आमदारांपैकी धवलसिंह जडेजा यांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. तीनपैकी दोन मूळचे काँग्रेसचेच होते.

ठाकोर काँग्रेसमध्ये राहणार

गुजरातमधील इतर मागासवर्गीय समाजाचे नेते आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये दाखल झालेले आक्रमक नेते म्हणून ओळख असलेले अल्पेश ठाकोर हे सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करणार अशी अटकळ बांधली जात होती. पण अहमद पटेल आणि राजीव सातव यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी बेत बदलला. काँग्रेसमध्येच राहून लोकांची सेवा करणार असल्याचे अल्पेश ठाकोर यांनी म्हटले आहे.

भाजपकडून दबावतंत्र -सातव

गुजरातमधील काँग्रेस आमदारांना फोडण्यासाठी पैसे व सत्तेचा दुरुपयोग भाजपकडून सुरू असल्याचा आरोप काँग्रेसचे गुजरात  प्रभारी खासदार राजीव सातव यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.  काल राजीनामा दिलेले सबारिया यांना आधी चार महिने तुरुंगात डांबण्यात आले. सारे खटले मागे घेण्याचे आश्वासन देऊन त्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. मोदी-शहा यांच्या मूळ राज्यात भाजपचे नुकसान होऊ शकते अशा विरोधी नेत्यांना गळाला लावले जाते वा तुरुंगात टाकले जात आहे. गुजरातची जनता लोकसभेत भाजपला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास सातव यांनी व्यक्त केला.

Story img Loader