मुंबई :  हिंदुंमध्ये फोडाफोड आणि महाराष्ट्रात मराठी-अमराठी भेदभाव ही भाजपची चाल असल्याचा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केला.  महाराष्ट्र नेहमी देशाला दिशा दाखवतो. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाराष्ट्राने पुन्हा एकदा दिशा दाखवायची आहे, असे आवाहन करीत शिवसैनिकांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचा संदेश दिला. तसेच तुमच्यासाठी धोका पत्करून शस्त्रक्रिया केली असून मी महाराष्ट्रभर फिरणार आहे, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

शिवसंपर्क अभियानाचा पहिला टप्पा विदर्भ आणि मराठवाडय़ात पार पाडला. आता दुसरा टप्पा कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात पार पडणार असून त्यानिमित्त मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या तिन्ही भागांतील शिवसेना जिल्हाप्रमुख व जिल्हासंपर्कप्रमुख यांच्याशी संवाद साधला. पश्चिम बंगाल आणि केरळसारखे आपल्याला हिंदुद्रोही ठरवायचा प्रयत्न भाजप करत आहे. बंगालचे मोठे कर्तृत्व आहे. या वेळी ममतादींदींनी गेल्या वेळेपेक्षा अधिक जागा मिळवल्या. आपण नेहमी म्हणतो महाराष्ट्र दिशा दाखवतो. आता महाराष्ट्राने पुन्हा एकदा दिशा दाखवायची. येणाऱ्या काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होत आहेत. या वेळीही महाविकास आघाडी निवडून येणार, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला. हिंदुंमध्ये फोडाफोड, महाराष्ट्रात मराठी-अमराठी, ही भाजपची चाल आहे, असेही त्यांनी नमूद केले.

संयुक्त महाराष्ट्र समिती कुणी आणि कशी फोडली? मुंबई आपण लढवून मिळवली. ती जनसंघाने जागांसाठी फोडली. त्यामुळे यांचे मराठीवर आणि हिंदुत्वावर प्रेम नाही. तर यांना सगळे स्वत:साठी हवे आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणायचे जे कर्माने मरणार त्याला धर्माने काय मारायचे, अशी टीकाही  मुख्यमंत्र्यांनी भाजपवर केली.  जन्मापासून शिवसेनेकडे नवीन तरुण रक्त आहे. गावागावांतून शिवसैनिकांकडे सातत्याने लक्ष द्या आणि आवश्यक बदल करा. पूर्वी शाखेचे फलक होते व शाखा कार्यालय होते. त्याकडे लक्ष द्या. अशा छोटय़ा छोटय़ा गोष्टींतून शिवसेना वाढवायची आहे. शिवसैनिक अंगार आहे. फक्त त्यांना भेटून धीर द्या. आम्ही तुमच्यासोबत आहोत हे त्यांना समजू द्या. गावाची जनतेची कामेही करून घ्या, असा संदेश मुख्यमंत्र्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिला.

महाराष्ट्रभर दौरा

शिवसेना इतरांपेक्षा वेगळी आहे, हे दाखवण्यासाठी शिवसंपर्क अभियान आहे. इतर पक्षांनी संपर्क आधीच सुरू केला आहे. शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून सरकारची कामे लोकांपर्यंत पोहोचवा. शिवसेना त्यांच्यासाठी काय करत आहे याबाबत जागरूकता निर्माण करा. तुमच्यासाठी धोका पत्करून मी शस्त्रक्रिया केली आहे. आता त्यातून बरा होत असून १४ मे रोजी मुंबईत तर ८ जूनला मराठवाडय़ात सभा आहे. आता मी महाराष्ट्रभर फिरणार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले.

Story img Loader