भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जाहीर इशारा दिला. यानंतर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रत्युत्तर देताना त्यांच्या दिसण्यावरून टीका केली. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपाने तीव्र आक्षेप घेत शाब्दिक हल्ला चढवला. भास्कर जाधव यांनी गोऱ्या कातडीच्या ब्रिटिशांप्रमाणे वर्णभेदी शेरेबाजी केल्याचा आरोप भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला.
केशव उपाध्ये म्हणाले, “भास्करशेठ, भारतीयांना रंगावरून हिणवणाऱ्या गोऱ्या कातडीच्या ब्रिटिशांनाही भारतीयांनी घालवले आहे. तुम्ही कोण लागलात? ब्रिटिशांनी भारतीयांना गोऱ्या कातडीच्या अहंकारातून हिणवले. भारतीयांना कृष्णवर्णावरून अपमानीत केले. उद्धव ठाकरे गटाच्या भास्कर जाधवांनी ब्रिटिशांच्या याच मानसिकतेतून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या रंगावरून, त्यांच्या दिसण्यावरून अपमानास्पद शेरेबाजी केली आहे.”
“मातोश्रीच्या प्रवेशद्वारावरून भास्कररावांना अपमानित करून हाकलून दिले”
“भास्करशेठ, रंग, रूप माणसाच्या हातात नसतं. माणसाचं रूप नाही, तर कर्तृत्व बघावं. अत्यंत सामान्य परिस्थितीतून बावनकुळे यांनी आपल्या कष्टाच्या, मेहनतीच्या जोरावर राजकारणात महत्वाची पदे भूषवली आहेत. मंत्रीपद मिळवण्यासाठी बावनकुळेंना भास्कर जाधवांसारखी पक्षांतरे करावी लागली नव्हती. ज्या मातोश्रीच्या प्रवेशद्वारावरून भास्कररावांना अपमानित करून हाकलून दिले गेले त्याच उद्धवरावांची भास्कररावांना आरती करावी लागते आहे,” असं मत केशव उपाध्ये यांनी व्यक्त केलं.
“रंग , रूपाचा माज करू नका”
केशव उपाध्ये म्हणाले, “या उद्धवरावांना आपले आमदार सांभाळता न आल्याने त्यांची हिट विकेट कशी गेली , हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. रंग , रूपाचा माज करू नका. ब्रिटनचा सध्याचा पंतप्रधान भारतीय वंशाचा आहे, हे लक्षात ठेवा. अमेरिकेलाही बराक ओबामा यांना राष्ट्राध्यक्ष म्हणून स्वीकारावे लागले होते. राजकारणात टीका जरूर करावी, पण एखाद्याच्या रंग रुपावरुन टीका करून भास्कररावांनी आपली ब्रिटिश मानसिकता दाखवून दिली आहे. वर्ण , जात विसरून विठ्ठलभक्तीची शिकवण महाराष्ट्राच्या भागवत धर्माने दिली आहे.”
हेही वाचा : भास्कर जाधवांकडून चंद्रशेखर बावनकुळेंची तुलना वेस्ट इंडिजच्या ‘या’ खेळाडूबरोबर; म्हणाले…
“रंगावरून शेरेबाजी करून भागवत धर्माचाच अपमान”
“तुकाराम महाराज म्हणतात , “वर्णअभिमान विसरली याती, एकएकां लोटांगणीं जाती. निर्मळ चित्तें जालीं नवनीतें, पाषाणा पाझर सुटती रे” भास्कररावांनी बावनकुळे यांच्या रंगावरून शेरेबाजी करून भागवत धर्माचाच अपमान केला आहे,” असा आरोप केशव उपाध्ये यांनी केला.