Anil Parab ED Raid: परिवहन मंत्री अनिल परब यांनाही आता तुरूंगाची हवा खावी लागेल. त्यांनी आता त्यासाठी तयार रहावे, असा इशारा भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिला आहे. अनिल परब यांच्या निवासस्थानी व राज्यात सात ठिकाणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापासत्र सुरू केले. सोमय्या यांनी परब यांच्या विरोधात विविध पातळ्यांवर तक्रारी नोंदविल्या असून ईडीने त्यासंदर्भात गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे. माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यानेही परब यांना पैसे दिल्याचा जबाब दिला आहे.
मोठी बातमी! शिवसेना नेते अनिल परब यांच्या घरावर ED ची धाड; मुंबई, पुणे आणि रत्नागिरीत कारवाई सुरु
या पार्श्वभूमीवर बोलताना सोमय्या म्हणाले, “बेनामी मालमत्ता, आर्थिक अफरातफर (मनी लाँड्रिंग), बोगस (शेल) कंपन्या, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयालयाकडे करण्यात आलेल्या तक्रारी आणि फेमा कायद्यातील तरतुदींच्या उल्लंघनासाठी ईडीने कारवाई सुरू केली आहे. मंत्री अनिल देशमुख, नवाब मलिक हे तुरूंगात गेले. आता परब यांची वेळ आली आहे”.
“यशवंत जाधव यांच्या दुबई संबंधांची ईडीने चौकशी केली असून हसन मुश्रीफ व अन्य नेत्यांची चौकशी सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारमधील गैरव्यवहार करणाऱ्या नेत्यांवर कठोर कारवाई होईल,” अशी अपेक्षा सोमय्या यांनी व्यक्त केली.
अनिल परब यांच्या घरावर ईडीची धाड
अनिल परब यांच्या वांद्र्यातील घरावर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) धाड टाकली आहे. ईडीचे अधिकारी सकाळी अनिल परब यांच्या वांद्रे येथील घऱी आणि मरिन ड्राईव्हमधील सरकारी निवासस्थानी दाखल झाले आहेत. यासोबत पुणे आणि रत्नागिरीमधील अनिल परब यांच्या मालकीच्या जागांचीही पाहणी केली जात आहे. अनिल परब यांच्याशी संबंधित मुंबई, पुणे आणि रत्नागिरीमधील एकूण सात ठिकाणी ईडीकडून धाड टाकण्यात आली आहे.