शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा किरीट सोमय्यांवर आयएनएस विक्रांतच्या नावे घोटाळा केल्याचा पुनरुच्चार केला आहे. शिवसेना याप्रकरणी राज्यभरात निदर्शनं करणार असून दिल्लीतही संसदेत स्थगन प्रस्ताव देण्यात आला आहे. दरम्यान हा मनी लाँड्रिंगचा प्रकार असू शकतो असं संजय राऊत यांनी म्हटलं असून पीएमएलए कायद्यांतर्गंत कारवाईचं आव्हान ईडीला दिलं आहे. संजय राऊतांनी केलेल्या आरोपांना किरीट सोमय्यांनी लगेच पत्रकार परिषद घेत उत्तर दिलं. मात्र यावेळी पत्रकारांनी प्रश्न विचारताच सोमय्यांनी पत्रकार परिषद आटोपली
“अजूनपर्यंत संजय राऊत एक कागदही दाखवू शकले नाहीत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पण एफआयआरची प्रत देत नाहीत. आम्ही एक दमडीचा घोटाळा केला नाही,” असं किरीट सोमय्या म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, “माझं पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना आव्हान आहे की, ५८ कोटी गोळा केले, कोणत्या चार बिल्डरकडे मनी लाँड्रिंग केलं हे संजय राऊतांनी सांगितलं असून ती माहिती जनतेसमोर ठेवावी. आम्ही कोणत्याही प्रकारच्या चौकशीला सामोरं असून घाबरत नाही. ठाकरे सरकारचे घोटाळे काढत असून काढतच राहणार”.
“१२ वाजता जरंडेश्वरच्या शेतकऱ्यांसोबत मी ईडी कार्यालयात जात आहे. जरंडेश्वर साखर कारखाना बेनामी पद्धतीने अजित पवारांनी ताब्यात घेतला असून त्यांना तो परत करावा लागेल,” असंही यावेळी ते म्हणाले.
संजय राऊत आज काय म्हणाले –
“भ्रष्टाचाराची व्याप्ती मोठी आहे. देशभरातून पैसे गोळा करण्यात आले असून हा आकडा मोठा असू शकतो. मी फक्त राज्यातील आकडा आहे. है पैसे सोमय्यांनी निवडणुकीत वापरले आहेत. पीएमसी बँकेच्या माध्यमातून पैसे चलनात आणले आणि नील सोमय्याच्या व्यवसायात वापरण्यात आले,” असा आरोप संजय राऊतांनी केला.
“७११ मोठे बॉक्स पैसे गोळा करण्यासाठी वापरण्यात आले. मुंलुंडच्या कार्यालयात हे बॉक्स ठेवण्यात आले. काही बॉक्स फोडण्यात आले. त्या पैशांची बंडलं बांधण्यासाठी कार्यकर्ते बोलवण्यात आले. ते पैसे पीएमसी बँकेतून पैसे वळवण्यात आले. काही बॉक्स हे सोमय्यांच्या बिल्डर मित्राच्या कार्यालायत ठेवण्यात आले. हा मनी लाँड्रिंगचा प्रकार होऊ शकतो. पीएमएलए कायदा लागू शकतो. ईडी नावाची संस्था भाजपाची बटीक नसेल तर कायद्यानुसार कारवाई होऊ शकते. मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही,” असंही राऊत म्हणाले.