मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या नावे कोर्लई गावात १९ बंगले नावावर असून या व्यवहारासंबंधी आरोप केल्यानंतर किरीट सोमय्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आरोप सिद्ध करण्याचं आवाहन दिल्यानंतर किरीट सोमय्या आज कोर्लई गावाला भेट देणार असून रवाना झाले आहेत. दरम्यान शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांच्या या भेटीला विरोध केला असल्याने पुन्हा एकदा पुण्याप्रमाणे संघर्ष होण्याची भीती आहे. दुसरीकडे प्रशासनाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख सुरक्षाव्यवस्था ठेवली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

किरीट सोमय्यांनी शेअर केलं रश्मी ठाकरेंनी कोर्लई ग्रामपंचायतीला लिहिलेलं पत्र

कोर्लई गावाला निघण्याआधी किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी कोर्लईच्या जमिनीवर घरं आहेत की नाहीत याबाबत ठाकरे परिवारानं स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी केली. महाराष्ट्रातील जनतेला वास्तव कळावं यासाठी आपण जात असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच मी मुख्यमंत्री असताना माझे १९ बंगले चोरीला गेले. माझ्या पत्नीचे १९ बंगले मी सांभाळू शकलो नाही असं मुख्यमंत्र्यांनी कबूल करावं, महाराष्ट्रातील जनता माफ करेल असंही ते म्हणाले.

सोमय्या भर पत्रकार परिषदेत चप्पल उचलत म्हणाले, “मी संजय राऊत यांना माझा जोडा…”

“महाराष्ट्रातील जनतेला वास्तव समजून घ्यायचा आहे. ज्या सरपंचांनी मे २०१९ मध्ये ग्रामपंचायतीच्या सभेत जानेवारी २०१९ मध्ये रश्मी ठाकरेंनी अर्ज केला की मी ३० एप्रिल २०१४ ला जो करार नोंद केला, अन्वय नाईकडून जी जमीन घेतली त्यावरील सर्व गोष्टी माझ्या आहेत. जमीन माझ्या नावावर हस्तांतरित झाल्याचं जानेवारी २०१९ मध्ये त्यांनी लिहिलं. पण घरं माझ्या नावावर करा यासाठीही पत्र लिहिण्यात आलं. मे २०१९ मध्ये हेच ग्रामपंचायत सभेत हेच सरपंच अध्यक्षपदी होते आणि त्यांनीच प्रस्ताव पारित केला. जून २०१९ मध्ये घरं नाव करण्यात आली,” असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं.

“११ नोव्हेंबर २०२० ला जेव्हा मी अन्वय नाईक आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संबंधांची माहिती बाहेर आणली तेव्हा १२ नोव्हेंबरला ठाकरे आणि वायकर कुटुंबाने यांच्या बँक खात्यातून सगळे कर ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा झाले. १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत सहा वर्षाच्या पावत्या अन्वय नाईक यांच्या नावे दिला. २०१८ मध्ये त्यांचं निधन झालं. २०२०, २१ च्या पावत्या रश्मी ठाकरेंच्या नावे देण्यात आल्या. त्यानंतर आम्ही जर हे १९ बंगले ठाकरे, वायकर कुटुंबाचे आहेत तर त्याचे ५ कोटी १८ लाखांचं जमिनीचं व्हॅल्यूएशन इन्कम टॅक्स आणि प्रतिज्ञापत्रात का दाखवलं नाही,” अशी विचारणा किरीट सोमय्यांनी केली.

“मी कोर्लई गावात पहिल्यांदा गेलो होतो तेव्हाही सरपंचांनी विरोध केला होता. तेव्हा त्यांनी १९ घरं आहेत तर गैर काय अशी विचारणा केली होती. माझा काही विरोध नसून घऱं आहेत की नाहीत याचं स्पष्टीकरण ठाकरे कुटुंबाने द्यावं. महाराष्ट्रातील जनतेला समजून घ्यायचं आहे. मी घोटाळा उघड केल्यानंतर ही घरं अचानाक गायब झाली का? चोरीला गेली का?,” अशी विचारणा किरीट सोमय्यांनी केली आहे.

“महाराष्ट्रातील साडे बारा कोटी जनतेला माझ्याकडून अपेक्षा आहे. मी त्यांचा वकिली संघर्ष करत असून ते पाठीशी आहेत,” असं किरीट सोमय्यांनी सांगितलं. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “१७ महिन्यांपासून मी पाठपुरावा करत आहे. आम्हाला आज ग्रामपंचायतीत जाऊन त्यांनी माहिती अधिकार काद्यांतर्गंत जी कागदपत्रं दिली आहेत त्याबाबत समजून घ्यायचं आहे. उद्धव ठाकरेंनी आजपर्यंत एकदाही नकार दिलेला नाही. वास्तव काय आहे हेच समजून घ्यायचं आहे”.

“ठाकरे परिवार कधी खोटं बोलू शकत नाही. तेथील सरपंच काय बोलतात याला अर्थ नाही. २००९ पासून दरवर्षी अन्वय नाईक कर भरत होते. मग ते काय खोटं बोलत होते?,” असं किरीट सोमय्या म्हणाले. पोलिसांनी जाऊ दिलं नाही तर अर्ज देऊन मागे येऊ असं सांगत किरीट सोमय्या यांनी कोणताही संघर्ष करणार नसल्याचं स्पष्ट केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp kirit somaiya maharashtra cm uddhav thackeray wife rashmi thackeray korlai grampanchayat sgy