राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपप्रकरणी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना माफीचा साक्षीदार होण्यास विशेष न्यायालयाने बुधवारी परवानगी दिली. यामुळे वाझे हे या खटल्यात आरोपी नव्हे, तर सीबीआयचे साक्षीदार असतील. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी परिवहनमंत्री अनिल परब आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आता अनिल परब आणि उद्धव ठाकरेंची झोप उडाली असेल असा टोला किरीट सोमय्यांनी लगावला आहे.
“मला हिंदी सिनेमाचा डायलॉग आठवतो अब तेरा क्या होगा कालिया…अनिल परब यांना झोप येत नसेल आणि उद्धव ठाकरेंचीही झोप उडाली असेल. उद्धव ठाकरेंनी बेकायदेशीरपणे सचिन वाझेची नियुक्ती केली होती. सचिन वाझेकडून आलेला १०० कोटीच्या वसुलीचा पैसा अनिल परब यांच्या रिसॉर्टमध्ये गुंतवण्यात आला होता. अनिल देशमुख गेले आता अनिल परब आणि उद्धव ठाकरे तुमचं काय होणार?,” असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.
सचिन वाझे माफीचा साक्षीदार ; अनिल देशमुखांविरोधातील भ्रष्टाचाराचे प्रकरण
महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यासंबंधी बोलताना ते म्हणाले की, “उद्धव ठाकरेंना इतकी भीती का वाटते? स्वतःच्या पक्षाचे आणि मित्रपक्षाचे आमदार विकले जाऊ शकतात असा आरोप संजय राऊत करत आहेत, देवेंद्र फडणवीस नाही. बेईमान कोण आहे…शिवसेनेचे आमदार की शिवसेनेचे नेते?”
वाझे यांनी विशेष न्यायालय आणि या प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) पत्र लिहून याप्रकरणी माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली होती. गेल्याच आठवडय़ात वाझे यांना माफीचा साक्षीदार होण्यासाठी सीबीआयने मंजुरी दिली होती.
होणार काय?
माफीचा साक्षीदार झाल्यानंतर संबंधित आरोपीला प्रकरणातील अन्य आरोपींविरोधात तपास यंत्रणेचा साक्षीदार म्हणून साक्ष नोंदवावी लागते. माफीच्या साक्षीदाराने दिलेली साक्ष ही प्रकरणातील अन्य आरोपींवरील गुन्हा सिद्ध करण्यासाठी वापरली जाईल. माफीचा साक्षीदार म्हणून वाझे यांची शिक्षा माफ होईल.