भाजपा नेते किरीट सोमय्यांचे पुत्र नील सोमय्या यांनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांनंतर अटक टाळण्यासाठी नील सोमय्या यांनी कोर्टात धाव घेतली आहे. एकीकडे किरीट सोमय्या संजय राऊतांच्या आरोपांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचा दावा करत असताना दुसरीकडे नील सोमय्या अटक टाळण्यासाठी कोर्टात गेले आहेत. २३ फेब्रुवारीला त्यांनी ही याचिका केली आहे. नील सोमय्या यांच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.
काहीही चूक नाही, चौकशी करा; भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचे प्रत्युत्तर
सोमय्या यांचे पुत्र नील यांच्या मालकीच्या निकॉन इन्फ्रा कन्स्ट्रक्शनमध्ये पीएमसी बँक घोटाळय़ातील आरोपी राकेश वाधवान हे भागीदार आहेत. या प्रकल्पासाठी सोमय्यांनी ४०० कोटींची जमीन साडेचार कोटींमध्ये विकत घेतल्याचा असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी नील सोमय्या यांच्यावर आरोप केले होते. तसंच बाप, बेटे जेलमध्ये जाणार असून कोठडीचं सॅनिटायजेशन सुरु असल्याचंही म्हटलं होतं.
“कोठडीचे सॅनिटायझेशन सुरू, बाप बेटे जेलमध्ये…”; संजय राऊतांनी सोमय्यांवर साधला निशाणा
न्यायालयात जाणार नाही सांगत सोमय्यांनी फेटाळले होते आरोप
“४०० कोटींना मारा गोळी, निकॉन इन्फ्रा कन्स्ट्रक्शनचा प्रकल्प अगदीच छोटा असून त्यामध्ये पीएमसी बँकेतील एक पैसाही आलेला नाही. आम्ही दमडीचीही चूक केलेली नाही. आम्ही गैरव्यवहार केल्याचे पुरावे असतील तर ठाकरे सरकारने आमच्या विरोधात चौकशी करावी, त्याविरोधात न्यायालयातही जाणार नाही,” असे प्रत्युत्तर भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत दिलं होतं.
सोमय्या यांनी सर्व आरोप पूर्णपणे फेटाळले होते. “नील वा माझा वाधवानशी संबंध नाही, पीएमसी बँकेशीही संबंध नाही. वास्तविक, पीएमसी बँकेतील घोटाळा मीच उघड केला होता. आम्हाला तुरुंगात टाकायचे तर खुशाल टाका. आम्ही चौकशीला सामोरे जायला तयार आहोत, आम्ही घाबरत नाही,” असं सोमय्या म्हणाले होते.