शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी अद्यापही सुरुच आहेत. संजय राऊतांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरील आरोप सिद्ध करण्याचं आव्हान दिल्यानंतर किरीट सोमय्यांनी आता रश्मी ठाकरेंचं पत्रच ट्विटरला शेअर केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी हे १९ बंगले नावावर करण्यासाठी कोर्लई ग्रामपंचायतीला लिहिलं होतं असं किरीट सोमय्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
ट्विटमध्ये काय सांगितलं आहे –
जानेवारी (आणि मे) २०१९ मध्ये श्रीमती रश्मी उद्धव ठाकरे यांनी कोर्लई ग्रामपंचायत अलिबागला त्यांच्या नावावर 19 बंगले ट्रान्सफर करण्यासाठी पत्र लिहिले असं किरीट सोमय्या यांनी ट्वीटमध्ये लिहिलं असून सोबत पत्राची प्रत जोडली आहे.
किरीट सोमय्यांचे आरोप काय आहेत?
“रश्मी उद्धव ठाकरे यांनी १२ नोव्हेंबर २०२० ला या १९ बंगल्यांचा मालमत्ता कर कोलराई ग्रामपंचायतला भरला. रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी हा कर भरला आहे. इतकंच नाही तर रश्मी ठाकरे यांनी आधीच्या दोन वर्षांचा मालमत्ता कर भरला असून त्याआधीच्या सहा वर्षांचा मालमत्ता कर अन्वय नाईकच्या नावे आहे,” असं किरीट सोमय्यांनी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं.
“१ एप्रिल ते २०१३ ते ३१ मार्च २०२१ पर्यंतचा १९ बंगल्याचा कर यांच्या खात्यातूनच गेला आहे. ११ नोव्हेंबर २०२० ला अन्वय नाईक आणि उद्धव ठाकरे यांच्यातील जमिनीचे तसंच व्यवसायिक संबंध मी उघड केले होते. अन्वय नाईक यांनी २००८ मध्ये बांधले होते. हा ठाकरे सरकारनेच दिलेला रेकॉर्ड आहे. २००९ पासून दरवर्षी या बंगल्याचा कर भरला जात आहे. आधी अन्वय नाईक आणि नंतर रश्मी ठाकरे, मनिषा वायकर हा कर भरत होत्या,” असं किरीट सोमय्यांनी सांगितलं.
सोमय्या भर पत्रकार परिषदेत चप्पल उचलत म्हणाले, “मी संजय राऊत यांना माझा जोडा…”
“ग्रामपंचायतीचा रेकॉर्ड गेल्या वर्षी मी मिळवला आहे. त्यात ग्रामपंचायतीने रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांच्यातर्फे ३० जानेवारी २०१९ रोजी घरपट्टी नावे करण्याचा अर्ज आला असून मान्य करण्यात आल्याचं नमूद आहे. रश्मी ठाकरेंच्या नावाने घरं दाखवत आहेत. इतकंच नाही तर रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी एप्रिल २०१४ मध्ये करार केला. त्यात घरं असल्याचे पुरावे त्यांनी जोडले असून किरीट सोमय्या, नील सोमय्या यांनी जोडलेले नाहीत. महत्वाचं म्हणजे हे घर वनविभागाच्या जमिनीवर बांधण्यात आलं आहे,” अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली.