मुंबई महापालिकेने पाणीपुरवठय़ाबाबत नवे धोरण आखले आहे. या धोरणानुसार अधिकृत झोपडीधारक, खासगी जमिनीवरील अघोषित झोपडीधारक, तटीय नियमन क्षेत्रात (सीआरझेड) वास्तव्यास असलेले, सरकारी जमिनींवरील झोपडीधारक आदींना मानतावादी दृष्टिकोनातून जलजोडणी देण्यात येणार आहे. . राज्याचे पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी पालिका मुख्यालयात काल याची घोषणा केली. यावरून भाजपाने नेते आशिष शिल्लार यांनी मुंबई महापालिका व मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
“मुंबईतील सर्व झोपडपट्ट्यांना पाणी द्यायला हवे याबाबत न्यायालयाने चर्चा केली होती. त्यामुळे आता सर्वांना पालकमंत्री पाणी देणार हा मुद्दा नवीन नाही. बरं सर्वांना देणार म्हणता मग मुंबईतील कोळीवाडे, गावठाणांचा उल्लेख का करीत नाही. आमच्या या मुळ मुंबईकरांवर राग आहे का?” असा सवाल शेलार यांनी केला आहे.
तसेच, “बरं आता निवडणुका जवळ आल्यावर तुम्हाला मुंबईचं पाणी कसं आठवलं? त्यामुळे कुछ तो गडबड है…पाणी कुठेतरी मुरतेय? बहुतेक समुद्राचे पाणी गोडे करण्याचे कंत्राट द्यायचे आहे, म्हणून तर पाण्याची गरज निर्माण केली जात नाही ना? पाणी रे पाणी तेरा रंग कैसा?” असं म्हणत आशिष शेलार यांनी निशाणा देखील साधला आहे.
नव्या धोरणामुळे मुंबईतील बहुसंख्य रहिवाशांना पिण्याचे शुद्ध, स्वच्छ पाणी मिळू शकेल, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी सोमवारी पालिका मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. याबाबतची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या १ मे रोजी करतील, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.