मुंबईमधील रस्त्यांवरील खड्ड्यांवरून मुंबईकरांमध्ये प्रचंड नाराजीचे व प्रशासनाविरोधात संतापाचे वातावरण आहे. या मुद्द्यावरून भाजपाने देखील आक्रमक भूमिका घेतली असून, मुंबई मनपावर जोरदार टीका केली जात आहे. शिवाय, महापालिकेतील सत्ताधारी पक्ष म्हणून शिवसेना व मुंबईच्या महापौरांवर देखील निशाणा साधला जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते आशिष शेलार यांनी आज पत्रकारपरिषदेतून शिवसेना व मुंबई मनपावर जोरदार टीका केली. “वरळीमध्ये थ्रीडी मॅपिंगचा ढोल आणि संपूर्ण मुंबईत मात्र खड्डे लपवायचे झोल. वरळी आणि कलानगर सोडून मुंबई आहे हे शिवसेनेला व महापौरांना मान्य आहे का?” असं शेलार यांनी यावेळी म्हटलं.

मुंबईतील खड्ड्यांच्या मुद्य्यावरून पत्रकारपरिषदेत बोलताना आशिष शेलार म्हणाले की, “मुंबई महापालिका रोज जणूकाही हसवणुकीची स्पर्धा घ्यावी, अशा पद्धतीची माहिती समोर आणत आहे. बीएमसीच्या पोर्टलवर बीएमसी पॉटहोल ट्रॅकिंग सिस्टिम आहे. या ट्रॅकिंग सिस्टिममध्ये संपूर्ण मुंबई शहरात म्हणे मनपा असं म्हणते आहे, ९०० चं खड्डे आहेत. पोर्टलवर मुंबई शहरातील जे तक्रारदार माहिती देत आहेत. ते फोटो काढतात, त्याबाबतची माहिती, पत्ता ही सर्व माहिती अपलोड करताता, तरी ती माहिती देखील म्हणे संपूर्ण मुंबईत ९२७ चं खड्डे आहेत, असं सांगितलं जातं. म्हणजे मनपा जेव्हा स्वतः ट्रॅकिंग करते तेव्ही देखील ९०० चं खड्डे असतात आणि नागरिक तक्रार करतात तेव्हा देखील संपूर्ण मुंबईत ९२७ खड्डे असल्याचंच सांगितलं जातं. या पेक्षा हास्यास्पद काय असणार? आणि म्हणून एकाबाजूला मनपा वरळीमध्ये थ्रीडी मॅपिंग करते. म्हणून आमचं म्हणणं आहे की वरळीमध्ये थ्रीडी मॅपिंगचा ढोल आणि संपूर्ण मुंबईत मात्र खड्डे लपवायचे झोल. हे धंदे शिवसेनेचे आहेत.”

तसेच, “मुंबईच्या महापौरांना आमचा सवाल आहे, मुंबईचे संपूर्ण क्षेत्रफळ तुमच्या डोळ्यासमोर कधी असतं का? संपूर्ण मुंबईचा नकाशा विकासासाठी कधी तुम्ही पाहता का? याचं कारण नवीन फूटपाथला रिलिंग द्यायची तर अगोदर वरळी, वाहतूक सिग्नलसाठी अद्यावत दिवे द्यायचे असतील तर आधी वरळी. संपूर्ण मुंबईत मोठ्याप्रमाणात पूल आहेत, पण पूलाच्या खाली सुशोभिकरण करायचं असेल, तर वरळी. आता थ्रीडी मॅपिंग करायचं आहे, तर ते देखील वरळी. कोविडच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांसाठी आयसीयू सेंटर बनवायचं आहे तर वरळी आणि त्या पलिकडे पाणी तुंबतं म्हणून पाण्याचा निचरा करायचा असेल, तर वरळीवरून थेट कलानगर सिग्नल. मग त्या कलानगर सिग्नलला असंख्य पंप. मग वरळी आणि कलानगर सोडून मुंबई आहे, त्याचं अस्तित्व आहे. हे शिवसेनेला व महापौरांना मान्य आहे का? आणि म्हणून खड्ड्यांच्या बाबतीतही बनवाबनवी व पुन्हा एकदा सांगतोय वरळीत केलेल्या थ्रीडी मॅपिंगची देखील बनवाबनवी आहे. येणाऱ्या काळात आम्ही ते देखील उघड करू.” असा इशारा देखील आशिष शेलार यांनी यावेळी दिला.

मंत्री राजेश टोपे यांच्या खात्याची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी

मंत्री राजेश टोपे यांनी माफी मागून प्रकरण संपणार नाही, आपल्या कृत्यावर, पापांवर माफी मागितली म्हणजे पडदा पडणार नाही.
ज्या आमच्या विद्यार्थ्यांची ही संधी हुकली त्यांनी केलेली मेहनत, कुटुंबाचा त्याग आणि त्यानंतर त्यांचे झालेले नुकसान याला आरोग्य खाते जबाबदार आहे. काही दलालांना आधीच प्रश्न पत्रिका कशी मिळाली? ती ठराविक लोकांपर्यंत कशी पोहचते? पोलिस यंत्रणा याबाबत कसे काही कळत नाही ? हा सत्तेचा दुरुपयोग नव्हे का? त्यामुळे माफी मागायची आणि पळ काढायचा असे करता येणार नाही. राजेश टोपे यांच्या खात्याची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, रामशास्त्री प्रभुणे यांची भूमिका माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घ्यावी अशी अपेक्षा आहे, अशा शब्दांत भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी आरोग्य विभागाच्या परिक्षांवर प्रतिक्रिया दिली.

Story img Loader