भाजपा नेते आशिष शेलार मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे. आशिष शेलार राज ठाकरेंच्या भेटीसाठी त्यांचं निवासस्थान शिवतीर्थवर दाखल झाले आहेत. या भेटीमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. महत्त्वाचं म्हणजे, राज ठाकरे यांनी शनिवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर लगेचच आशिष शेलार राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं होतं. गणेशोत्सवात राज ठाकरेंनी त्यांची भेटही घेतली होती. यामुळे मनसे आता भाजपासोबत युती करणार अशी चर्चा पुन्हा एकदा रंगली होती. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत नवं राजकीय समीकरण पहायला मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. मनसे नेते मात्र आपण स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं सांगत आहेत.
राज ठाकरेंनी ‘वर्षा’वर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट का घेतली? नेमकं कारण आलं समोर
दरम्यान आशिष शेलार यांनी अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक तसंच महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची भेट झाल्याची चर्चा आहे. याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
राज ठाकरेंची ‘वर्षा’वर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट
राज ठाकरे यांनी शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर राज ठाकरे पोहोचले होते. पुणेकरांना महापालिकेनं पाठवलेल्या मिळकत कर वसुलीच्या नोटीसांसदर्भातील एक पत्र देण्यासाठी राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे.
पुणे महापालिकेने अचानक शहरांत पूर्वलक्षी प्रभावाने मिळकत कर वसुलीच्या नोटिसा पुणेकरांना पाठवल्या आहेत. १९७० च्या एका ठरावाप्रमाणे करपात्र मुल्यात कायद्यातील तरतुदीप्रमाणे मिळकत करात काही सूट दिली जात होती. २०१९ ला ही सूट विखंडित करण्यात आली. मधल्या ४८ वर्षांच्या काळात महालेखा परीक्षणात एकही आक्षेप आलेला नसताना ही सूट विखंडित का केली? असा सवाल राज ठाकरेंनी विचारला आहे.
तूर्तास या निर्णयाला स्थगिती दिलेली असली तरी, यावर कायम स्वरूपी निर्णय घेऊन पुणेकरांना दिलासा द्यावा, अशी मागणी राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. याबाबतचं एक पत्रही मुख्यमंत्र्यांना देण्यात आलं आहे.