Yamini Jadhav Burka Distribution: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबई आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीला यश मिळाले. विशेषतः शिवसेनेच्या उबाठा गटाला मुस्लीम मतांचा लाभ झाला, असा आरोप भाजपा आणि शिंदे गटाकडून वारंवार केला जात होता. उद्धव ठाकरे यांनी हिरव्या मतांच्या जोरावर खासदार निवडून आणले, असेही भाजपा आणि शिंदे गटाचे नेते सांगत होते. मात्र आता याच मुस्लीम समाजाच्या मतांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडूनही होताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीला दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव यांनी आगामी विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे. नुकताच त्यांनी मुस्लीम महिलांना बुरखा वाटण्याचा कार्यक्रम घेतला. मात्र मित्रपक्षांकडून या कार्यक्रमावर टीका होत आहे.

लोकसभा निवडणुकीत यामिनी जाधव यांचा अरविंद सावंत यांच्याकडून ५२ हजार मतांनी पराभव झाला होता. भायखळा विधानसभेतच यामिनी जाधव यांना मताधिक्य मिळू शकले नव्हते. त्यानंतर आता मतदारसंघातील मुस्लीम मतांनाही जवळ करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यासाठी त्यांनी बुरखा वाटपाचा कार्यक्रम घेतला. मात्र आता यावर भाजपानेच आक्षेप घेतला आहे. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी या कार्यक्रमावर टीका केली आहे.

हे वाचा >> शिंदे गटाकडून बुरखावाटप केल्याने वाद

काय म्हणाले आशिष शेलार?

प्रसार माध्यमांशी बोलत असताना आशिष शेलार यांना यामिनी जाधव यांच्या कार्यक्रमाबाबत प्रश्न विचारला गेला. तेव्हा ते म्हणाले, “नेमका काय कार्यक्रम घेतला, याची मला माहिती नाही. पण बुरखा वाटप सारखे कार्यक्रम भाजपाला मान्य नाही.” दि. ७ सप्टेंबर रोजी यामिनी जाधव यांनी आपल्या मतदारसंघात १००० बुरखा वाटले होते. या कार्यक्रमानंतर शिवसेना उबाठा गटाने महायुतीवर टीकेची झोड उटविली आहे.

शिंदे गटाचे दुटप्पी राजकारण – अंधारे

उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, यामिनी जाधव यांचे कृत्य दुटप्पीपणा आणि स्वार्थी राजकारणाचा कळस आहे. लोकसभा निवडणुकीत मुस्लीम समाजाची मते मिळाली नाहीत, म्हणून एका बाजूला रडगाणे गाणाऱ्या शिंदे गटाने मुस्लीम समाजाच्या विरोधात द्वेष पसरविण्याचे काम केले. आता मुस्लीम मतपेटीला आकर्षित करण्यासाठी आमदार यामिनी जाधव यांच्याकडून बुरखा वाटपासारखे कार्यक्रम घेतले जात आहेत.

भाजपाचे आमदार नितेश राणे हे मुस्लीम समाजाच्या विरोधात भाष्य करत असतानाच यामिनी जाधव यांचा हा कार्यक्रम समोर आला आहे.

आम्हाला आमच्या मतदारसंघाची काळजी – जाधव

आपल्या कार्यक्रमाबद्दल माहिती देताना यामिनी जाधव म्हणाल्या की, माझ्या मतदारसंघात जवळपास ५० टक्के मुस्लीम समाज राहतो. माझे पती यशवंत जाधव हे ३० वर्षांपासून या विभागात नगरसेवक म्हणून काम करत आहेत. दिवाळीला आम्ही हिंदूंना भेटवस्तू वाटतो, पण मुस्लीम समाजासाठीही काहीतरी करावे, या कल्पनेतून बुरखा वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. मुस्लीम समाजातील महिला बुरखा वापरतात, त्यामुळे आम्ही बुरखा वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला. आमच्या मित्रपक्षांचा वेगळा दृष्टीकोन असू शकतो, पण आम्हाला आमच्या मतदारसंघाची काळजी घ्यावी लागेल, असेही त्या म्हणाल्या.