राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना नुकतीच ‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटाचे शो बंद पाडल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. शिवाय त्यानंतर त्यांच्याविरोधात विनयभंगाचाही गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे ७२ तासांत दोन खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचे सांगत आता जितेंद्र आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आक्रमक झाली आहे. तर आव्हाडांच्या राजीनाम्याच्या निर्णयास गृहमंत्री फडणवीस जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते आशिष शेलार यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसाल प्रत्युत्तर देत जितेंद्र आव्हाडांवर निशाणा साधला.
भाजपा नेते आशिष शेलार म्हणाले, “आमदारकीचा राजीनामा देणे आणि प्रत्यक्षात पोलिसांनी त्यांच्यावर दाखल केलेले आरोप याचा काय संबंध? चर्चगेटच्या गाडीत बसून मुलुंडचं स्टेशन आलं का विचारण्यासारखं आहे. जर ते निर्दोष आहेत, तर त्यांनी त्यांची कायदेशीर बाजू लढावी. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेल्या संविधानात प्रत्येक निर्दोष व्यक्तील आपलं निर्दोषत्व सिद्ध करण्याची मूभा दिलेली आहे. मग जेव्हा निर्दोषत्व सिद्ध करता येत नसेल, त्यावेळी हे वेडेचाळे केले जातात. त्यामुळे आमदारकीचा राजीनामा आणि याचा काही संबंध नाही आणि द्यायचा तर द्या ती जागाही आम्ही जिंकून येऊ.”
जितेंद्र आव्हाडाच्या राजीनाम्यास पूर्णपणे गृहमंत्री जबाबदार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणणं आहे. यावर शेलार म्हणाले, “होय खरं आहे, गृहमंत्र्यांनी महाराष्ट्रातील सामान्य मराठी माणसाला, मराठी कुटुंबाला त्यावर कोणी आरोप, प्रत्यारोप, जबरदस्ती, विनयभंग, दादागिरी आणि मारहाण करू नये. केल्यास त्याला कायदेशीर बडगा आहे. हे गृहमंत्र्यांनी दाखवलं आहे. म्हणून गृहमंत्र्यांचं स्वागत आणि अभिनंदन आम्ही करतो.”
याशिवाय “माझी चोरी पकडली गेली तर पकडणारा पोलीस जबाबदार, असं तालिबानी माणसाला शोभणारं वक्तव्यं हे जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेस करत आहे.” असंही शेलार म्हणाले आहेत.