122 Crore Cooperative Bank Scam: न्यू इंडिया सहकारी बँकेत १२२ कोटींचा अपहार केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे. यापूर्वी काही जणांना गैरव्यवहार प्रकरणात अटक झाली होती. आता भाजपाचे माजी प्रदेश सचिव हैदर आझम यांचे बंधू जावेद आझम यांना या अपहार प्रकरणी अटक केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला असून आज (१८ मार्च) जावेद यांना न्यायालयात सादर केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी न्यू इंडिया को-ऑप बँकेतील १२२ कोटींची रक्कम गहाळ झाल्याबाबत चौकशी केल्यानंतर १२ फेब्रुवारी रोजी सदर घोटाळा समोर आला होता. याप्रकरणी आतापर्यंत सात जणांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेचे महाव्यवस्थापक आणि अकाऊंट विभागाचे प्रमुख हितेश मेहता, माजी सीईओ अभिमन्यू भोअन, बांधकाम व्यावसायिक धर्मेश पौन, मालाड येथील व्यापारी उन्नाथन अरूणाचलम आणि त्यांचे बंधू मनोहर अरुणाचलम आणि कंत्राटदार कपिल देढिया यांना अटक झालेली आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने पोलिसातील सूत्रांच्या आधारे दिलेल्या वृत्तानुसार, ११ मार्च रोजी मुख्य आरोपी हितेश मेहता यांची लाय डिटेक्टर चाचणीचा अहवाल प्राप्त झाला. पण हा अहवाल दिशाभूल करणारा असून तो सत्य किंवा निर्णायक नाही, असे पोलिसांनी सांगितले आहे.
उन्नाथन यांच्या अटकेनंतर त्यांच्या चौकशीतून जावेद यांचे नाव समोर आले होते. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना सोमवारी ताब्यात घेतले. उन्नाथन यांनी चौकशीत सांगितले की, त्यांनी जावेद यांच्या इलेक्ट्रॉनिक व्यापारासाठी १८ कोटी रुपये दिले होते. जावेद यांचा व्यवहार आणि त्यांच्या राजकीय हितसंबंधाचा या अपहारावर काही प्रभाव होता का? याबाबत आता पुढील तपास केला जात आहे.
२०२२ साली हैदर आझम हे वादात अडकले होते. त्यांची पत्नी रेशमा या बांगलादेशी नागरिक असून त्यांनी पासपोर्ट बनविण्यासाठी बोगस कागदपत्रे सादर केल्याचा आरोप केला गेला होता, अशी माहिती टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे. मात्र नंतर त्यांच्या पत्नीची या प्रकरणातून मुक्तता करण्यात आली.
द न्यू इंडिया सहकारी बँकेचे १.३ लाख खातेदार असून महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये त्यांच्या २८ शाखा होत्या.