मुंबईतील लोकल रेल्वेत एका २० वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडल्यानंतर आता भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी त्या तरुणीवर बलात्कार झाला नसल्याचा दावा केला. तसेच मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाचं एक निवेदन ट्वीट करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंवर सडकून टीका केली. यात चित्रा वाघ यांनी आरोपीनं मुलीशी लगट करण्याचा प्रयत्न केल्याचं म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चित्रा वाघ म्हणाल्या, “अहो महाराष्ट्राच्या मोठ्ठ्या ताई, काविळ झालेल्यांना जग जसं पिवळं दिसतं तसं तुमचं झालंय. सत्तेचा ‘स्ट्राईक रेट’ कमी झाल्याचा हा परिणाम आहे हे आम्ही समजू शकतो. लोकलमध्ये महिलेवर बलात्कार झाल्याचं एवढं मोठं वक्वत्य करण्याआधी मोठ्ठ्या ताईंनी थोडी शहानिशा तरी करायला हवी होती.”

“मुंबई लोकल रेल्वेत बलात्कार झालाच नाही”

“तुम्ही मुलीवर लोकल रेल्वेत बलात्कार झाल्याचं ट्वीट केलंय, पण तसं काहीच घडलं नाही. नाहक मुलीची बदनामी करू नका. त्या आरोपीनं मुलीशी लगट करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी लगेच विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. ही वस्तुस्थिती,” असं चित्रा वाघ यांनी म्हटलं.

“अफवा पसरवू नका”

चित्रा वाघ पुढे म्हणाल्या, “आपण मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तांकडूनही माहिती घेऊ शकला असता, पण ते न करता बलात्कार झाला म्हणत ट्वीट केलंत. तुमच्या या वक्तव्यामुळे खोट्या बातम्यांचा आणि अफवांचा सुकाळ होण्यास हातभार लागणार आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की, अफवा पसरवू नका आणि माझी संपूर्ण जनतेला विनंती आहे की अफवांवर विश्वास ठेवू नका!”

हेही वाचा : मुंबईत धावत्या लोकलमध्ये २० वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार, सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाल्या, “पुन्हा एकदा…”

“लोकलमध्ये महिलांना सुरक्षित वातावरण देणं ही रेल्वे पोलिसांची जबाबदारी”

“अत्याचार करण्याचा प्रयत्न असेल किंवा अत्याचार हे दोन्ही गंभीर आहे. महिला सुरक्षेशी तडजोड केली जाणार नाहीच. लोकलमध्ये महिलांना सुरक्षित वातावरण देणं ही रेल्वे पोलिसांची जबाबदारी आहे. त्यापासून पळ काढता येणार नाही. या निमित्तानं रेल्वे हेल्पलाईन आणि लोकलमधील महिलांबाबतचे गुन्हे याचं ॲाडीट करणं गरजेचं आहे आणि ते येणाऱ्या दिवसात नक्कीच होईल,” असंही चित्रा वाघ यांनी नमूद केलं.