महाराष्ट्र भाजपाच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये सचिन वाझेंच्या पत्रानंतर अजित पवार आणि अनिल परब यांची सीबीआय चौकशी केली जावी, अशी मागणी करण्याचा ठराव संमत करण्यात आला. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. सीबीआय आणि ईडी तुमच्या पक्षाचे सदस्य आहेत का? अशा सवाल करत संजय राऊतांनी ईडी आणि सीबीआयसारख्या तपास यंत्रणांचं अवमूल्यन होत असल्याची टीका केली होती. या पार्श्वभूमीवर आता भाजपाकडून चित्रा वाघ यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. “भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये काही लोकांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. मला हे कळत नाही की यामुळे संजय राऊतांच्या छातीत कळ का आली?” असा खोचक सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे.
संजय राऊतांनी नैतिकतेचे धडे शिकवू नये
“संजय राऊत यांनी आम्हाला नैतिकतचे धडे शिकवू नये. सत्तेचा गैरवापर करत एका महिलेला त्रास दिला गेला. एवढंच नाही, तर ती न्याय मागण्यासाठी न्यायालयात गेली, तेव्हा तिला खोट्या गुन्ह्यात अडकवलं गेलं. अशा निरंकुश आणि शोषक मनोवृत्तीच्या लोकांना प्रभू श्रीरामचंद्रांचं महत्वही कळणार नाही आणि रामजन्मभूमीचं पावित्र्यही कळणार नाही”, असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत. आपल्या ट्वीटर हँडलवरून त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला असून त्यामध्ये आपली भूमिका मांडली आहे.
संजय राऊत यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले असून त्या प्रकरणात तपास करून अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने मुंबई पोलीस आयुक्तांना दिले होते. त्याच प्रकरणाचा संदर्भ घेऊन चित्रा वाघ यांनी टीका केली आहे.
कारवाई तर होणारच!
दरम्यान, यावेळी चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांना खुलं आव्हानच दिलं आहे. “कालच्या भाजपाच्या बैठकीत काही लोकांची सीबीआय चौकशी करा अशी मागणी करण्यात आली. मला हेच कळत नाही की संजय राऊतांच्या छातीत का कळ आली? वाझे तिथे जेलमध्ये बसून त्याच्या पापाच्या भागीदारांची नावं घेतोय, कारवाई तर होणारच. कालच्या भाजपाच्या कार्यकारिणीमध्ये ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण, बारा बलुतेदारांना पॅकेज, शेतकऱ्यांना हक्काचे पीकविम्याचे पैसे अशा मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यावर संजय राऊतांनी भाष्य करावं. माझं त्यांना आव्हान आहे की त्यांनी या प्रश्नांवर महाविकासआघाडीला जाब विचारायला पाहिजे आणि त्यांच्या शौर्याचा पुन्हा एकदा परिचय महाराष्ट्राच्या जनतेला करून द्यायला पाहिजे”, असं चित्रा वाघ या व्हिडिओमध्ये म्हणाल्या आहेत.
संजय राऊतांनी आम्हाला नैतिकतेचे धडे शिकवू नये
भाजप कार्यकारणीत काही जणांवर CBI चौकशी करा म्हणून मागणी झाली तेव्हा संजयजींच्या छातीत धडकी का भरली ??
वाझे जेलमधून आपल्या पापाच्या भागीदारांचे नाव घेणार तर कारवाई होणारचं ना @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil pic.twitter.com/pwgsl60qYC— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) June 25, 2021
भाजपाचा रोख आता अजित पवारांच्या दिशेने! ‘या’ प्रकरणात केली CBI चौकशीची मागणी!
ई़डी आणि सीबीआयची बदनामी केली जात आहे – संजय राऊत
“ईडी किंवा सीबीआयशी आमचं काही वैयक्तिक वैर नाही. त्या राष्ट्रीय संस्था आहेत. जर देशाचं नुकसान होणारी घटना असेल, मनी लाँड्रिंग असेल तर नक्कीच सीबीआय आणि ईडीने तपास केला पाहिजे. पण आज ज्या प्रकारची प्रकरणं त्यांच्याकडे दिली जात आहेत त्यावरून हे राजकीय वाटत आहे. ई़डी आणि सीबीआयची बदनामी केली जात आहे. जमिनीचे व्यवहारच काढायचे असतील तर ईडी आणि सीबीआयसाठी अयोध्येतील महापौर उपाध्याय यांच्या नातेवाईकांनी रामजन्मभूमी न्यासासोबत केलेला जमिनीचा व्यवहार अत्यंत योग्य प्रकरण आहे. तिथेसुद्धा या केंद्रीय यंत्रणांनी तपास करणं गरजेचं आहे. आणि फक्त महाराष्ट्राच्याच कार्यकारिणीने कशाला तर भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने अयोध्येत जो जमीन घोटाळा झाल्याचं स्पष्ट दिसत आहे त्याचा सीबीआय आणि ईडीकडून तपास करावा,” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.