शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू निहार ठाकरे आणि भाजपाचे नेते आणि राज्यामधील माजी कॅबिनेट मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांचा विवाह सोहळा मुंबईत पार पडला. मुंबईच्या ताज पॅलेसमध्ये झालेल्या या विवाहसोहळ्यात राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांची उपस्थिती होती. गेल्या अनेक दिवसांपासून अंकिता आणि निहारच्या लग्नाची चर्चा होती. या विवाह सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सपत्निक हजेरी लावली आणि वधु-वरांना शुभेच्छा दिल्या. अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांनी या विवाहाचे फोटो शेअर केले आहेत.
अंकिता पाटील कोण आहेत?
अंकिता पाटील या सध्या पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. त्या काँग्रेसकडून जिल्हा परिषदेच्या सदस्या म्हणून काम पाहतात. तसेच अंकिता या इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या निर्देशक पदावर कार्यरत आहेत. अंकिता यांचे वडील हर्षवर्धन पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणामधील महत्वाच्या नेत्यांपैकी एक नाव आहे. हर्षवर्धन यांनी २०१९ साली निवडणुकांच्या आधीच काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.
निहार ठाकरे कोण?
निहार ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत. बाळासाहेबांचे दिवंगत पुत्र बिंदूमाधव ठाकरे हे निहार यांचे वडील. बिंदूमाधव यांचं १९९६ साली एका अपघातामध्ये निधन झालं. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुतणे असणारे निहार हे मुंबईमधील एक प्रतिष्ठित वकील आहेत.
कशी झाली भेट?
अंकिता पाटील यांनी लंडनमधील हार्वर्ड विद्यापिठामध्ये एका वर्षाचा एका विशेष कोर्सचं शिक्षण घेतलं आहे. तसेच लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्येही त्यांनी शिक्षण घेतलं आहे. तर निहार ठाकरे यांनीही हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेतलं असून एलएलएमपर्यंत शिक्षण झालं आहे. हे शिक्षण घेत असतानाच अंकिता आणि निहार यांची ओळख झाल्याचं सांगितलं जातं.