भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांची करोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. त्यांनी स्वतः ट्विटरवरून यासंदर्भात माहिती दिली आहे. महत्वाचं म्हणजे हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुतणे निहार ठाकरे यांचा विवाहसोहळा २८ तारखेला मुंबईत पार पडला. या लग्नसोहळ्याला अनेक मोठ्या नेत्यांनी हजेरी लावली होती. पाटील यांना करोनाची लागण झाल्यानं या विवाहसोहळ्यातील पाहुण्यांना देखील करोनाची बाधा होण्याची शक्यता आहे.
“सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोरोना चाचणी केली असता ती टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी व काळजी घ्यावी ही विनंती,” असं त्यांनी ट्वीट करून म्हटलंय.
दरम्यान, या विवाहसोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे यांनाही करोनाची लागण झाली आहे. सुप्रिया सुळेंनी बुधवारी त्यांना करोना झाल्याची माहिती दिली होती.
अंकिता आणि निहार ठाकरेंच्या लग्नाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते. या विवाहसोहळ्यात हजेरी लावलेले नेते एकापाठोपाठ एक करोना पॉझिटीव्ह येत आहेत, त्यामुळे येत्या काळात आणखी काही लोक बाधित होण्याची शक्यता आहे.