भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करत त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पोलिसांना पोलीस ठाण्यात जाऊन अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच “शिव्या देती, बघून घेतो म्हणती, हे भविष्य आमच्या हाती, मी राष्ट्रवादी” असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. या ट्वीटमध्ये केशव उपाध्ये यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना टॅग करत या आमदारावर कारवाई करणार का? असा सवालही केलाय.
केशव उपाध्ये म्हणाले, “उंचावून माना फुगवुन छाती, आपल्या आमदाराची पाहून प्रगती, आवाज घुमवती, शिव्याही देती, साहेबांच्या डोळ्यापुढती, नवीन स्वप्ने फुलून येती, सत्तेची ही पाहुनी मस्ती, जनता म्हणते, हे तर नक्की, राष्ट्रवादी! शिव्या देती, बघून घेतो म्हणती, हे भविष्य आमच्या हाती, मी राष्ट्रवादी.”
“राज्यात ही कायदा सुव्यवस्थाची लक्तर दिसत आहेत. आमदार थेट पोलिसांना पोलीस ठाण्यात जाऊन अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत आहे. शरद पवार, दिलीप वळसे पाटील आणि उद्धव ठाकरे या आमदारावर काही कारवाई करणार का?” असा सवालही केशव उपाध्ये यांनी विचारला आहे.