अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना खार पोलिसांनी आजच्या नाट्यमय घडामोडीनंतर ताब्यात घेतलं. मात्र यानंतर भाजपाचे नेते किरीट सोमय्या हे खार पोलीस स्थानकामध्ये पोहोचले. एक ते दीड तास सोमय्या पोलीस स्थानकामध्ये होते. त्यानंतर पोलीस स्थानकामधून बाहेर पडताना पोलीस स्थानकाबाहेर जमलेल्या शिवसैनिकांनी सोमय्यांच्या गाडीवर दगडफेक केली. तसेच यावेळी सोमय्यांच्या गाडीचा पाठलाग करत चप्पलाही फेकल्या. या हल्ल्यामध्ये सोमय्या किरकोळ जखमी झाले आहेत. गाडीच्या डाव्या बाजूची काच दगडफेकीमध्ये फुटली असून सोमय्यांच्या हनुवटीला किरकोळ जखम झालीय.
नक्की वाचा >> “पोलीस आयुक्त उद्धव ठाकरेंचे नोकर आहेत का?, खून करण्याचा…”; हल्ल्यात जखमी झाल्यानंतर सोमय्यांची संतप्त प्रतिक्रिया
या प्रकरणामध्ये तक्रार दाखल करण्यासाठी सोमय्या वांद्रे पोलीस स्थानकामध्ये पोहोचले आहेत. किरीट सोमय्या हे खार पोलीस स्थानकामधून बाहेर आल्यानंतर काही अंतरापर्यंत पोलिसांनी जमलेल्या शिवसैनिकांना गाडीपासून दूर ठेवले. मात्र समोरच मेट्रोचं काम सुरु असल्याने अरुंद रस्त्यावरुन जाताना गाडीचा वेग पुढे जाऊन मंदावला. याच संधीचा फायदा घेत काही जणांनी सोमय्यांच्या गाडीवर दगडफेक केली. काहींनी सोमय्यांच्या गाडीवर चप्पलाही फेकल्या. सोमय्यांच्या गाडीचा पाठलाग करत काहीजण मोठ्याने शिवीगाळ करत होते.
सोमय्यांसोबत गाडीने प्रवास करणाऱ्या सहकाऱ्याने या हल्ल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पोलिसांवर बेजबाबदारपणाचा आरोप केलाय. “हा महाराष्ट्र शिवरायांचा महाराष्ट्र राहिलेला नाही हा मुघलांचा महाराष्ट्रा झालाय. भाडोत्री गुंड पोलीस स्थानकाबाहेर शिवीगाळ करतायत, शिव्या देतायत. इथे दिसतंय की गाडीवर दगडफेक झालीय. मोडतोड झालीय. किरीट सोमय्यांच्या बाजूला मी बसलेले त्यांच्या हनुवटीला काच लागलीय. दगड त्यांच्या हाताला लागलाय. हे कोणाचं राज्य आहे?, उद्धव ठाकरेंना शोभतं का हे?”, अशा शब्दांमध्ये या व्यक्तीने संताप व्यक्त केलाय.
नक्की वाचा >> शिवसैनिकांच्या हल्ल्यात सोमय्या जखमी: “मी सरकाला इशारा देतोय की…”; गृहमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याच सांगत फडणवीसांचा संताप
दरम्यान, दुसरीकडे सोमय्यांविरोधातही शिवसेनेचे नेते आणि मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनीही खार पोलीस स्टेशनमध्ये सोमय्यांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी गेले आहेत.