मुंबई : कोरोना काळात महापालिकेकडून करण्यात आलेल्या खिचडी वितरणाप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. खासदार संजय राऊत यांचे विश्वासू सुजीत पाटकर यांच्यासह सहा जणांविरोधात हा गुन्ह दाखल करण्यात आला असून याप्रकरणी सहा कोटी ३७ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. आग्रीपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात फसवणूक, फौजदारी विश्वासघात, कट रचणे, आदी कलमांर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील ऊर्फ बाळा कदम, सह्याद्री रिफ्रेशमेंटचे राजीव साळुंके, सुजीत पाटकर, फोर्सव मल्टी सर्व्हिसेसचे भागिदार व कर्मचारी, स्नेहा कॅटरर्स, तत्कालीन सहाय्यक आयुक्त, इतर पालिका अधिकारी व संबंधीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हेही वाचा : जालन्यात मराठा मोर्चावरील लाठीचार्जवर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मुळात मराठा समाजाने…”
गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाळ लावणे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे. याप्रकरणी महापालिका अधिकारी, कर्मचारी व इतर व्यक्तींची आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केली होती. करोना काळात कामगारांना वाटप करण्यासाठी महापालिकेकडून खिचडी करण्यात आली होती. त्यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. महापालिकेत करोना काळात १६० कोटींचा खिचडी गैरव्यवहार झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. त्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करण्यात आली होती.