केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र तसेच युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंना भाषा सुधारण्याचा सल्ला देतानाच आधी ‘मातोश्री’वरुन बाहेर निघा आणि मग आव्हान द्या असा टोला नारायण राणेंनी लागवला. तसेच आदित्य यांच्यासंदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी आदित्य यांचा उल्लेख शेंबडा मुलगा असा केला.
नक्की पाहा Video >> “उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाने आइस्क्रीमचा कोन दिला” टीकेवरुन सेनेचा राणेंना जशास तसा टोला; म्हणाले, “असं वाटत असेल तर…”
अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमधील सर्व पक्षांचे नेते एकत्र आले होते. त्यांनी शक्तीप्रदर्शन केलं असा संदर्भ देत राणेंना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राणेंनी सगळे एकत्र आले म्हणजे शक्ती तयार होत नाही, असा टोला लगावला. तसेच त्या लोकांमध्ये मतभेद आहेत, असा दावाही राणेंनी केला. ज्यांमध्ये शक्ती नसते ते असे एकत्र येऊन दाखवतात की आम्हाला उब मिळालीय आमच्यात शक्ती आली आहे, असंही राणे म्हणाले. त्याचप्रमाणे शक्ती ही भाजपाकडे असल्याचं राणेंनी यावेळी म्हटलं. देशात भाजपाची सत्ता आहे. राज्यात भाजपाची सत्ता आहे. देशातील जास्तीत जास्त राज्यांमध्ये आमची सत्ता आहे, असं राणेंनी म्हटलं.
नक्की वाचा >> “माझा भाऊ कॉप्या करुन…”; मुख्यमंत्री शिंदेंचा ‘ढ’ असा उल्लेख करत सुषमा अंधारेंचा हल्लाबोल
यानंतर राणेंनी उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली. “उद्धव ठाकरेला भाषा सुधरायला सांगा. हिंमत असेल तर मैदानात येऊन दाखवा. हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा. आता आम्ही पाडलं ना सरकार. आता म्हणे मैदानात या. आम्ही मैदानातच आहोत. ‘मातोश्री’ सोड तरी. ‘मातोश्री’चा दरवाजा उघडून बाहेर तरी बघ ना जग कसं आहे. उद्धव ठाकरेने उगाच बडबड करु नये,” असं राणे म्हणाले.
नक्की वाचा >> दीड वर्षांपूर्वीच ठाकरे कुटुंबाला लागलेली शिंदेंच्या बंडाची चाहूल? आदित्य ठाकरेंचा मोठा खुलासा; म्हणाले, “आमच्या घरात…”
यानंतर पत्रकारांनी आदित्य ठाकरेंचं नाव घेत प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रश्न पूर्ण होण्याआधीच नारायण राणेंनी पत्रकाराला थांबवलं. “ऐ, आता तुम्ही हेच प्रश्न विचारणार तर मी इथं जय हिंद, जय महाराष्ट्र म्हणेन. कसला आदित्य शेंबड्या मुलांचे प्रश्न मला विचारतो तू,” असं म्हणत आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेसंदर्भातील प्रश्न राणेंनी उडवून लावला.