मुंबईच्या मुलुंड वेस्ट परिसरातल्या एका सोसायटीत मराठी असल्यामुळे एका महिलेला कार्यालयासाठी जागा नाकारल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी समोर आला. संबंधित महिलेनं यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट टाकल्यानंतर मनसेनं त्याची दखल घेऊन या सोसायटीच्या सेक्रेटरींना समज दिली. त्यापाठोपाठ त्यांनी महिलेची माफी मागितली. मात्र, अरेरावी करणाऱ्या या सेक्रेटरी व त्यांच्या वडिलांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. गुरुवारी दिवसभर या प्रकाराची सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळाली. मात्र, आपल्यालाही असाच अनुभव आल्यायचा खुलासा भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांनी आता केला आहे.
नेमकं घडलं काय?
गुरुवारी तृप्ती देवरुखकर नावाच्या महिलेने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यात मुलुंड वेस्टमधील शिवसदन नावाच्या सोसायटीमध्ये आपण महाराष्ट्रीयन, मराठी असल्यामुळे आपल्याला कार्यालयासाठी जागा नाकारण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी याची दखल घेत शिवसदन सोसायटीचे अरेरावी करणारे सेक्रेटरी व त्यांच्या वडिलांना जाब विचारला. या दोघांनी तृप्ती देवरुखकर यांची माफीही मागितली. तसेच, महाराष्ट्रातील मराठी माणसांचीही माफी मागितली.
तृप्ती देवरुखकर यांनी नेमकं काय घडलं, याचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला होता. हा व्हिडीओ ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शेअर करत राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला जाब विचारला होता. या व्हिडीओचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा पाहायला मिळाली.
दरम्यान, एकीकडे हे प्रकरण गाजत असताना आता भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस, भाजपाच्या माजी आमदार व राज्याच्या माजी महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनीही आपल्याला मराठी असल्यामुळे घर नाकारण्यात आल्याचा गंभीर दावा केला आहे. पंकजा मुंडेंनी यासंदर्भात व्हिडीओच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली आहे.
“माझं सरकारी घर सोडून जेव्हा…”
सरकारी घर सोडून जेव्हा स्वत:चं घर घ्यायची वेळ आली, तेव्हा असाच अनुभव आल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. “माझं सरकारी घर सोडून मला घर घ्यायचं होतं. तेव्हा हा अनुभव मलाही बऱ्याच ठिकाणी आला की ‘मराठी लोकांना आम्ही घर देत नाही’ माझ्यासारख्या व्यक्तीलाही असा अनुभव आला. हे फार दुर्दैवी आहे. आत्ताचं राजकारणातलं वातावरण, समाजातलं वातावरण हे सगळं पाहाता समाजात कुठेतरी अस्वस्थता वाटते. आरक्षणासाठी भांडणं चालू आहेत. प्रत्येक रंगात माणूस वाटला गेला आहे. हिरवा, भगवा, पिवळा, निळा.. हे फार दुर्दैवी आहे”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
“मी कोणत्या एका भाषेची बाजू घेत नाही. कारण मुंबईचं सौंदर्य प्रत्येक भाषा, जात, धर्मानं नटलेलं आहे. ही देशाची राजकीय नसून आर्थिक राजधानी आहे. इथे सगळ्यांचं स्वागतच आहे. पण आम्ही अमुक लोकांना घर देत नाही असं जर काही इमारतींमध्ये बोलत असतील, तर हे दुर्दैवी आहे”, असंही त्यांनी नमूद केलं.