मुंबई : सध्याच्या राजकारणाचा कंटाळा आला असल्याने दोन महिने सुट्टीवर जात असल्याचे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी जाहीर केले. त्याच वेळी भाजपमध्येच राहणार असल्याची ग्वाही दिली. ‘माझे राजकीय जीवन संपविण्याचा डाव असून मी अंतर्मुख होऊन विचार करणार आहे’, असे मुंडे यांनी नमूद केले.  भाजप आणि राष्ट्रवादीच्या युतीमुळे धनंजय मुंडे यांच्या विरोधात लढण्याची संधी नसल्यानेच पंकजा नाराज असल्याचे बोलले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजप-शिवसेना सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसही सामील झाल्याने अनेक भाजप नेते अस्वस्थ आहेत. पंकजा मुंडे यांचा पराभव करून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे निवडून आले व आता मंत्री झाले आहेत. त्यामुळे भाजपला आगामी विधानसभा निवडणुकीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडावी लागेल आणि स्थानिक राजकारणातही धनंजय मुंडे यांचे वर्चस्व वाढणार आहे. त्यामुळे नाराज पंकजा मुंडे काँग्रेस नेत्यांना भेटल्याच्या चर्चा व बातम्या काही प्रसिद्धी माध्यमातून आल्याने पंकजा मुंडे यांनी त्याचे खंडन केले. मी एक विचारसरणी घेऊन राजकारणात वाटचाल केली व पक्षाचा शब्द अंतिम मानला. विधान परिषदेसाठी दोन वेळा उमेदवारी अर्ज तयार ठेवण्यास सांगूनही ऐनवेळी न भरण्याचे आदेश दिले व मी पक्षाचा आदेश मानला. तरीही माझ्या नैतिकतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असल्याने दु:ख होत असल्याचे मुंडे म्हणाल्या.

वरिष्ठ नेते पंकजाशी चर्चा करतील- फडणवीस

पंकजा मुंडे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि राष्ट्रीय सचिव असल्याने त्यांच्याशी पक्षाचे वरिष्ठ नेते संवाद साधतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेण्याचा निर्णय भाजपमधील काही नेत्यांना रुचलेला नाही. पण सर्वाशी संवाद साधला जाईल व प्रश्न सोडविले जातील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

धनंजय मुंडे यांची भेट

धनंजय मुंडे यांनी गुरुवारी पंकजा मुंडे यांची भेट घेतल्यावर बहिणीच्या नात्याने पंकजा यांनी त्यांना औक्षण करून मंत्रीपदाची शपथ घेतल्याने शुभेच्छा दिल्या. गेली अनेक वर्षे उभयतांच्या संबंधांमध्ये कटुता आली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader pankaja munde two months off from politics ysh
Show comments