मुंबई : नगरचे आमदार राम शिंदे यांच्या लेटरहेडवर बनावट स्वाक्षऱ्या करून जिल्हा नियोजन समितीकडून विकास निधी लाटण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. वांद्रे येथील रहिवासी असलेल्या मनोज कमलाकर भातणकर (५५) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा >>> मुंबई: मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन, सुरक्षा यंत्रणा सक्रिय
तक्रारीनुसार, राम शिंदे यांच्या स्थानिक विकास कार्यक्रम २०२२ – २३ अंतर्गत विकास निधीची ३ पत्रे पाठविण्यात आली होती. जवळपास दीड कोटी रक्कमेचे हे पत्र होते. शिंदे यांच्या लेटर हेडचा वापर करून त्यावर त्यांची बनावट स्वाक्षरी करण्यात आली होती. ही पत्रे मंजुरीसाठी मुंबईच्या जिल्हा नियोजन समितीकडे सादर करण्यात आल्याने तेथील अधिकाऱ्यांना संशय आला. शिंदेंना याबाबत समजताच त्यांनाही धक्का बसला. अखेर, कोणीतरी विकास निधी लाटण्यासाठी हा प्रकार केल्याचे समजल्यानंतर त्यांच्याकडून पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. याबाबत, एमआरएमार्ग अधिक तपास करत आहे. हे पत्र पाठविणाऱ्याचा पोलीस शोध घेण्यात येत आहे.