अडचणीत सापडलेल्या भाजपचे मौन
कोटय़वधींच्या नाफ्ता गैरव्यवहारप्रकरणी आरोप झालेला आणि खातेनिहाय चौकशी झालेला प्रकाश बाळबुधे हा विक्रीकर विभागाचा माजी अधिकारी सध्या भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा ‘बिनपगारी’ निकटवर्तीय सहकारी म्हणून वावरत आहे. बाळबुधे हा आपला अधिकृत स्वीय साहाय्यक नाही आणि आपण त्याला पगार देत नाही, असा बचाव दानवे यांच्याकडून केला जात असला, तरी भाजपनेच उघडकीस आणलेल्या एका घोटाळ्यातील वादग्रस्त व्यक्तीला निकटवर्तीय म्हणून खुद्द प्रदेशाध्यक्षांनीच सोबत घेतल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भ्रष्टाचारमुक्त प्रशासन आणि स्वच्छ कारभाराच्या वल्गना करणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी वादग्रस्त माजी शासकीय कर्मचाऱ्याला निकटवर्तीय सहकारी म्हणून सामावून घेतले आहे. सध्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यात विरोधी पक्षनेते असताना पेट्रोल-डिझेलमध्ये नाफ्ता भेसळीचे प्रकरण उजेडात आणून खळबळ माजवली होती. कोटय़वधींचा विक्रीकर बुडवून नाफ्ता आणला जातो आणि त्याची भेसळ होते, याबाबतचे पुरावेही त्यांनी दिले होते. त्यानंतर चौकशी आणि कारवाई झाली. तेव्हा ठाणे येथे विक्रीकर विभागात असलेल्या बाळबुधे यांची खातेनिहाय चौकशी झाली.
त्यांनी केलेला स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज गेल्या वर्षी सरकारने मंजूर केल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर गेल्या पाच-सहा महिन्यांपासून बाळबुधे हे दानवे यांच्याबरोबर सावलीसारखे वावरताना दिसू लागल्याने पक्षातही अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. बाळबुधे यांना दानवे यांच्याकडून पगार दिला जात नाही, असा दावा केला जात असला, तरी प्रदेशाध्यक्ष पदावरील व्यक्तीचा निकटवर्तीय म्हणून वावरणाऱ्या व्यक्तीला आपोआपच वलय प्राप्त होत असल्याने दानवे समर्थकांकडून उपस्थित केल्या जाणाऱ्या पगाराच्या मुद्दय़ावरूनही पक्ष अडचणीत आला आहे.
भाजपने अधिकृतपणे या वादावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही, तर पदाधिकाऱ्यांनी याबाबत मौनच पाळले. बाळबुधे प्रकरणाची चर्चा राजकीय वर्तुळात वेगाने सुरू होताच खुद्द दानवे यांनीही या प्रकरणी मौन पाळल्याचे दिसत आहे. याबाबत त्यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी वारंवार प्रयत्न करूनही दानवे यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. घोटाळे प्रकरणातील व्यक्तीला मदतनीस म्हणून ठेवण्यामुळे राजकीय वर्तुळात दानवे यांच्याविषयी चर्चा सुरू होताच, एक निनावी खुलासा व्हॉट्सअॅपसारख्या माध्यमांवरून वेगाने फिरू लागला. खातेनिहाय चौकशीत काहीही न आढळल्याने आधीच्या सरकारच्या काळात स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज मंजूर करण्यात आला, असा दावा करणारा हा खुलासा माध्यमांपर्यंत पोहोचविण्यासाठी बाळबुधे यांनीच मोर्चेबांधणी केल्याची चर्चा सुरू झाली असून भाजप आता या प्रश्नावर काय भूमिका घेते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.