मुंबई : अर्थसंकल्पातून सर्वांना खूष करता येत नाही, हे मान्य. पण जे वंचित राहिले आहेत त्यांना सरकारने हात दिला पाहिजे. ज्याच्या ताटात आहे, त्याच्या ताटात पुन्हा वाढणार का? विदर्भात गडचिरोलीवगळता इतर जिल्ह्यांच्या वाट्यास अर्थसंकल्पाने काय दिले, अशी विचारणा करत भाजपचे ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवर यांनी बुधवारी अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान राज्य सरकारची कानउघडणी केली. अर्थसंकल्पासाठी काही मागण्या केल्या होत्या. त्याची पत्रे संबंधित अधिकाऱ्यांना दिली होती. पण, एकाही मागणीला अर्थसंकल्पात स्थान मिळाले नाही, असेही ते म्हणाले.
राज्यात गेली काही वर्षे वैधानिक विकास मंडळे स्थापन झाली नाहीत. विदर्भ काय वसाहत आहे का? तुम्ही आमचा विचार करणार आहेत की नाही? राज्यातील सात जिल्हेवगळता इतर जिल्ह्यांची स्थिती वाईट आहे. त्यांच्यासाठी काय नियोजन आहे? केंद्र सरकारडून वित्त आयोगाचे पैसे येत नाहीत. मग, स्थानिक स्वराज्य संस्थांनी काय करायचे? सरकारने यावर विचार करावा, अशी सूचना मुनगंटीवार यांनी केली. तुम्ही पर्यटनवाढीच्या गप्पा करता, पण ताडोबाला आंतरराष्ट्रीय अभयारण्य का घोषित करत नाही? दाओसला १५ लाख कोटींची गुंतवणूक मिळाली, असे सांगता पण त्यातील रोजगार कोणते हे तुम्ही सांगत का नाही, असा सवाल मुनगंटीवार यांनी केला.
‘…सवालोंसे हैरान हूँ’
अर्थसंकल्पात तरतूद केलेला प्रत्येक पैसा खर्च व्हायला हवा, पण तसे होत नाही. मग अधिकारी करतात काय? कर्मचाऱ्यांच्या वेतनावर आपण वर्षाला २ लाख ४७ हजार कोटी खर्च करतो. तसेच दरवर्षी १६ हजार कोटींची पगारवाढ आणि १३ हजार कोटींची निवृत्ती वेतनवाढ देतो. इतके देऊनही कर्मचाऱ्यांत उदासिनता असेल तर नक्कीच आपले चुकत आहे, या शब्दांत मुनगंटीवार यांनी सरकारला सुनावले. मी सभागृहात काही बोललो की नाराज असल्याच्या बातम्या होतात. मी नाराज नाही पण ‘तुम्हारे मासूम सवालोंसे हैरान हूँ’ असा खुलासाही मुनगंटीवार यांनी केला.