मुंबई : विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी मिळविण्यासाठी भाजप नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे, हर्षवर्धन पाटील, परिणय फुके आदी १० नेत्यांच्या नावांची शिफारस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षश्रेष्ठींना केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. मात्र यासंदर्भात समाज माध्यमांवर सामायिक करण्यात आलेले आपल्या लेटरहेडवरील पत्र बनावट असल्याचे स्पष्टीकरण बावनकुळे यांनी दिले आहे.
हेही वाचा >>> दमदार मोसमी पावसाचा दिलासा; मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यांत पुढील दोनतीन दिवस मुसळधारांचा अंदाज
विधान परिषदेची निवडणूक पुढील महिन्यात होत असून भाजपचे उमेदवार पाच जागांवर निवडून येतील. या जागांवर उमेदवारी मिळविण्यासाठी अनेक नेते वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन प्रयत्न करत आहेत. पक्षश्रेष्ठींना शिफारस करण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून विचारविनिमय सुरू आहे. राज्यातील मराठा-ओबीसी आरक्षण वादाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह दानवे, फुके, हर्षवर्धन पाटील आदी नेत्यांच्या नावांवर विचारविनिमय केला जात आहे. पंकजा मुंडे यांना विधानसभा किंवा विधान परिषदेसाठी उमेदवारी न दिल्यास त्यांच्या समर्थकांमध्ये असंतोष निर्माण होऊन पक्षाला मराठवाड्यात फटका बसण्याची शक्यता आहे. परळी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे निवडून आल्याने पंकजा यांना विधानसभेसाठी कोणता मतदारसंघ द्यायचा, हा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांच्या नावाचा विचार विधान परिषदेसाठी होऊ शकतो. लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत पराभूत उमेदवारांना राज्यसभा किंवा विधान परिषदेसाठी उमेदवारी द्यायची नाही, हा पक्षाचा सर्वसाधारण निकष आहे. मात्र मुंडे, दानवे, हर्षवर्धन पाटील यांचा अपवाद करायचा का, याबाबत विचार सुरू आहे. फुके हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटचे सहकारी आहेत. याआधीही ते विधान परिषदेत आमदार होते. उमेदवारांच्या नावांची घोषणा लवकरच केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.