वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडी मैदानावर भाजपाचा महामेळावा सुरु होण्याआधी भाजपामधील अंतर्गत धुसफूस समोर आली आहे. स्टेजवर मुख्य मंडपामध्ये भाजपाचे दिवगंत नेते गोपीनाथ मुंडे यांचा फोटो न लावल्यामुळे मुंडे समर्थक नाराज झाले आहेत. यावेळी पंकजा मुंडे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करुन आपली नाराजी व्यक्त केली. गोपनीथ मुंडेंवर अन्याय होत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी बीडच्या खासदार प्रीतम मुंडेंनी घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण तरीही कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरुच आहे.

भाजपाने आज ३८ व्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने मुंबईमध्ये महामेळावा आयोजित केला आहे. राज्यभरातील भाजपाचे जवळपास ५ लाख कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित राहण्याची शक्यता असून भाजपाने या निमित्ताने शक्तिप्रदर्शनाचा घाट घातला आहे. त्यामुळे मुंबईत काही भागांमध्ये वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. वांद्रे-कुर्ला क्रीडा संकुलातील एमएमआरडीच्या मैदानावर सकाळी ११ वाजल्यापासून या मेळाव्याला सुरुवात होणार आहे.

भाजपाने राज्यभरातून येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी विशेष रेल्वे गाडया, बसेसची व्यवस्था केली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुंबईत पोहोचले असून ते या मेळाव्याला संबोधित करणार आहेत. शिवसेनेचा दसरा मेळावा तसेच अलीकडेच मुंबईत झालेल्या मनसेच्या पाडवा मेळाव्यापेक्षा दुप्पट गर्दी जमवून विरोधकांना संदेश देण्याची भाजपाची रणनिती आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करण्यासाठी भाजपाने आपली पूर्ण ताकत पणाला लावली आहे.

Story img Loader