राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी “गांधी हा एक विचार आहे. तो विचार संपवण्याचा एका मोठ्या राजकीय पक्षाचा प्रयत्न आहे. त्यामुळं हिंमत असेल तर, त्यांनी भोंदू बाबांच्या आडून चाचणी घेण्यापेक्षा अधिकृत भूमिका घेण्याचं धाडस दाखवावं” असं आव्हान भाजपाला दिलं. यानंतर भाजपा नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी रोहित पवार यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रवींद्र चव्हाण म्हणाले, “राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ ही सावरकर गौरव यात्रा आहे. कोण रोहित पवार? त्याची काय औकात आहे? त्याच्याबद्दल काय बोलायला पाहिजे? तो माणूस बोलण्याच्या औकातीचा नाही. ज्याला स्वातंत्र्यवीर सावरकर कळत नाही, त्याला बोलण्याचा काहीच अधिकार नाही.”

व्हिडीओ पाहा :

“चाटूगिरीत प्राविण्य मिळवणारे राऊतांसारखे लोक…”

दरम्यान, रवींद्र चव्हाण यांनी ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शैक्षणिक पदवीवरून संजय राऊतांवरही निशाणा साधला. ते म्हणाले, “तोंड मिळालं म्हणून काहीही बरळायचं, ही राऊतांची जुनी खोड आहे. चाटूगिरीत प्राविण्य मिळवणारे राऊतांसारखे लोक आज पंतप्रधान मोदींच्या डिग्रीची मागणी करत आहेत. गेल्या ९ वर्षांपासून मोदी १३५ कोटी भारतीयांचं यशस्वी नेतृत्व करत आहेत, यातच मोदींची डिग्री दिसून येते.”

रोहित पवार काय म्हणाले होते?

रोहित पवार म्हणाले होते, “श्री साईबाबा आणि महात्मा गांधी यांच्याबाबत दोन भोंदू बाबांनी केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध करतो. या निमित्ताने महाराष्ट्रात होऊ घातलेल्या निवडणुका कोणत्या दिशेला नेण्यात येत आहेत, याचा अंदाज येऊ लागलाय.”

“भोंदूबाबांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गांधींना नष्ट करण्याचे कुणी कितीही प्रयत्न केले तरी ते नष्ट होऊ शकत नाहीत. कारण गांधी हा विचार जगात अजरामर आहे. पण हे विचार संपवण्याचा एका मोठ्या राजकीय पक्षाचा प्रयत्न आहे. त्यामुळं हिंमत असेल तर, भोंदूंच्या आडून ट्रायल घेण्यापेक्षा त्यांनी अधिकृत भूमिका घेण्याचं धाडस दाखवावं,” असं खुलं आव्हान रोहित पवारांनी दिलं होतं.

हेही वाचा : राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “सत्ताधीशांनी कितीही…”

“निवडणुका जवळ आल्या की तथाकथित बाबा-बुवा या भोंदू लोकांना पुढं करून वादग्रस्त विधानं करायला लावायची. जाती-जातीत, धर्मा-धर्मात वाद निर्माण करायचा. नको त्या विषयांवर चर्चा घडवायची. मुख्य प्रश्नांवरून लोकांचं लक्ष दुसरीकडं वळवायचं आणि आपली राजकीय भाकरी भाजायची, हे या पक्षाचं पहिल्यापासूनच धोरण राहिलंय. पण संतांच्या आणि शिव-शाहू-फुले-आंबेडकरांसारख्या महापुरुषांच्या महाराष्ट्राला हा डाव समजत नाही, या भ्रमातून या पक्षाने बाहेर यावं. त्यांनी बेरोजगारी, ढासळती अर्थव्यवस्था, बिघडलेली कायदा व सुव्यवस्था आणि बोकाळलेला भ्रष्टाचार याबाबत लोक विचारत असलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत,” अशी टीका रोहित पवार यांनी केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp minister ravindra chavan answer open challenge of ncp mla rohit pawar rno news pbs