मुंबई महानगर पालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून भाजपा आमदार अमित साटम यांनी मंत्री आदित्य ठाकरेंवर पुन्हा निशाणा साधलाय. “मुंबई महापालिकेत आदित्यसेनेची भ्रष्टाचाराची शृखंला सुरूच आहे, त्यामुळे आम्हीपण आमची ‘पोलखोलची’ मालिका सुरूच ठेऊ. जनतेच्या हक्काचे पैसे लुबाडणारे यांचे काळे धंदे उघडे पाडू,” असा इशारा आमदार अमित साटम यांनी दिला.
“आदित्यसेना इतके दिवस काही खास कंपन्यांना फायदा व्हावा यासाठी निविदा काढत असे, पण आता मात्र ऐनवेळी सिविसीच्या गाईडलाईन व नियमांमध्येच थेट मोडतोड करून टक्केवारीसाठी विदेशी कंपन्यांना मार्ग मोकळा केला गेला. इलेक्ट्रीक बस खरेदीच्या निविदा प्रक्रिया पार पडत असताना २५ एप्रील रोजी बिडींगची डेड लाईन संपण्याचा केवळ दिड तास आधी यांनी थेट निविदेची पात्रता अटच बदलून टाकली. एवढ्या घाईगडबडीत कुणाच्या फायद्यासाठी संपूर्ण नियमांची पायमल्ली केली जातेय”, असा प्रश्न साटम यांनी उपस्थित केला.
“या भ्रष्टाचारासाठी स्पष्टपणे प्रशासकीय अधिकाऱ्यांचा वापर होतोय हे दिसत आहे. या सर्व प्रकारात प्रशासकीय अधिकारी इकबाल सिंग चहल व आदित्यसेना सामिल असल्यामुळे या महाभकास आघाडी सरकारकडनं यांच्यावरती पायबंद घातला जाणार नाही याची मला खात्री आहे. त्यामुळेच मी सेंट्रल व्हिजीलन्स कमिश्नरकडे तक्रार दाखल केली आहे व या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी,” अशी मागणी केल्याचं साटम यांनी सांगितलं.