“मुंबई शहरातील रस्ते आणि खड्ड्यांचा प्रदीर्घ प्रलंबित प्रश्न सरकारच्या नियोजन, दूरदृष्टी आणि विचाराच्या अभावामुळे सोडवला गेला नाही. गेल्या २४ वर्षात मुंबईतील रस्ते बनवण्यासाठी मुंबई महापालिकेने २१००० कोटींहून अधिक खर्च करूनही मुंबईतील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. त्यामुळे प्रत्येक रस्त्याच्या छोट्या निविदा काढण्यापेक्षा पश्चिम उपनगरे, पूर्व उपनगरे आणि शहरासाठी प्रत्येकी एक, फक्त ३ निविदा काढण्याची मुंबई महापालिकेला सूचना द्या,” अशी मागणी भाजपाचे आमदार अमित साटम यांनी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या संदर्भात भाजपाचे आमदार अमित साटम यांनी मुखमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून मागणी केली. त्यात म्हटलं आहे, “निविदेत काही अटी असाव्यात. त्यानुसार भारत सरकार आणि एनएचएआयसोबत (NHAI) काम करणार्‍या मोठ्या पायाभूत सुविधा कंपन्यांनाचा निविदेत सहभाग घेता येईल. पाणी, गॅस, वीज, इंटरनेट इत्यादी विविध युटिलिटिज टाकण्यासाठी वारंवार खोदकाम आणि खड्डे पडू नयेत यासाठी रस्त्याच्या निविदेतच युटिलिटी कॉरिडॉर बनवण्याची तरतूद असावी.”

“विविध कारणांसाठी सतत, अनियोजित खोदकामामुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्था आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे. शहरातील असंघटित फेरीवाल्यांचा प्रश्न विचित्र झाला आहे. त्याचे नियमन करण्याची गरज आहे. झोनल टाऊन व्हेंडिंग समित्यांनी हॉकिंग झोन निश्चित केले आहेत. १.२८ लाख हॉकर्सना हॉकिंग पिच वाटप करण्यास पात्र बनवले आहे. मात्र, मागील सरकारने २०१९ चे नवीन सर्वेक्षण पूर्ण होईपर्यंत या प्रक्रियेला अविचारीपणे स्थगिती दिली,” असा आरोप या पत्रात करण्यात आला.

हेही वाचा : Maharashtra News Live : बीडमध्ये पुन्हा अवैध गर्भपात गर्भलिंगनिदान; पती सासूसह चौघांवर गुन्हा दाखल, राज्यातील प्रत्येक अपडेट एका क्लिकवर…

“नियुक्त हॉकिंग झोनमधील हॉकिंग पिचेस पात्र फेरीवाल्यांना द्या आणि आमचे उर्वरित रस्ते आणि फूटपाथ मोकळे करा आणि नवीन सर्वेक्षण एकाच वेळी केले जाऊ शकते. दोन्ही समस्यांचे तार्किक निष्कर्ष काढल्यास शहरातील प्रदीर्घ प्रलंबित दोन समस्या यशस्वीपणे सोडविण्यास मदत होईल,” असेही साटम यांनी पत्रात म्हटले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mla amit satam letter to cm eknath shinde about mumbai road potholes pbs