भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला २ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सडकून टीका केलीय. सुपुत्रीच्या आग्रहामुळे राज्याच्या गृहमंत्रीपदी अनिल देशमुख यांनाच बसवावं लागलं. यामुळे महाराष्ट्राची पूर्ण जगात बदनामी झाली, असा आरोपही केला. पुतण्याबद्दल तर काय सांगावं, त्यांच्या भीतीने त्यांना सत्तेच्या केंद्रस्थानी बसवावं लागलं, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरीत्या पवार कुटुंबावर निशाणा साधला. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

आशिष शेलार म्हणाले, “सुपुत्रीच्या आग्रहामुळे राज्याच्या गृहमंत्रीपदी अनिल देशमुख यांनाच बसवावं लागलं. त्यामुळे महाराष्ट्राची बदनामी पूर्ण जगात झाली. वसुली पण होते. १०० कोटी रुपयांचे आकडे पण समोर येतात. गृहमंत्रीपदावरील माणूस गजाआड जातो. मटका किंग, बुकीज यांच्याशी व्यवहार सुरू होतात. पोलीस दलात गटबाजी होते. पोलिसांच्या बदल्या आणि बढतीत दलालांचा सुळसुळाट होतो. सुपुत्रीप्रेमामुळे महाराष्ट्राचं असं चित्र संपूर्ण देशाला दिसलं.”

“पुतण्याबद्दल तर काय सांगावं? त्यांच्या भीतीने…”

“पुतण्याबद्दल तर काय सांगावं? त्यांच्या भीतीने सत्तेच्या त्यांना केंद्रस्थानी बसवण्यात आले. हा निर्णय त्यांचा आहे, पण देशाला काय दिसतं? १००० कोटी रुपयांपेक्षा अधिकची बेनामी संपत्ती कशी आली? एका व्यक्तीने एका आयुष्यात संपूर्ण जीवन झिजवल्यानंतर सुद्धा एखाद कोटी मिळवणं मुश्किल होतं. त्यावेळी १ हजार बेनामी संपत्तीचं चित्र आयकर खातं दाखवतं,” असं मत आशिष शेलार यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : “हे सरकार म्हणजे ३ पैशांचं सरकार, पुत्र, पुत्री आणि पुतण्या…”, आघाडी सरकारच्या दोन वर्षांवर आशिष शेलार यांचा हल्लाबोल

“सहकारी कारखाना शेतकऱ्यांच्या पैशावर उभा राहतो, सरकारी मदत मिळते, जागा, वीज स्वस्तात मिळते. पण हाच कारखाना सहकारी बँकांचे कर्ज फेडू शकत नाही आणि मग बँक कारखाना जप्त करते. लिलाव बोली होते आणि पुतण्या तो कारखाना विकत घेऊन खासगी करतो. यातून शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरलं जातं,” असा आरोपही शेलारांनी केला.