राज्यात सध्या दहावीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा, या दोन मुद्द्यांवरून मोठी चर्चा सुरू आहे. काही विद्यार्थी-पालकांचं म्हणणं आहे की दहावी-बारावीच्या परीक्षा व्हायला हव्यात, तर काहींचं म्हणणं आहे की करोनाच्या पार्श्वभूमीवर त्या रद्द व्हायला हव्यात. मात्र, दुसरीकडे मुंबई उच्च न्यायालयाने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर ताशेरे ओढले असताना आता विरोधी पक्षांकडून या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरलं जात आहे. “दहावी, बारावीच्या परीक्षांच्या बाबतीत सरकारने विद्यार्थी आणि पालकांचा अंत पाहू नये. शिक्षणाचं महत्त्व या सरकारला कळलंय का? या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?” असा परखड सवाल आशिष शेलार यांनी केला आहे. तसेच, बार्ज पी-३०५ बुडल्याप्रकरणी अॅफकॉनला वाचवण्याचा प्रयत्न सरकार करत असून हा राज्य सरकारचा कुटिल डाव असल्याची परखड टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

“हा कुटील डाव मंत्रालयाच्या कुठल्या मजल्यावर शिजला?”

शापूरजी पालनजींना वाचवण्याची भूमिका सरकारमधला कुठला मंत्री करतोय, हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं, असं देखील आशिष शेलार यावेळी म्हणाले. “खरा आरोपी वाचवून जो आपली बाजूच मांडू शकणार नाही, अशावर केस दाखल करायची आणि दुसरीकडे केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करायची. यामध्ये डील तर झाली नाही ना? राज्य सरकारच्या ज्या प्रवक्त्यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली, त्यांनी याचं उत्तर द्यावं. ओएनजीसीनं परवानगी दिलेली नाही अॅफकॉनच्या संचालकांवरही गुन्हा दाखल नसताना जे हजर नाहीत त्या कॅप्टन राकेश यांच्यावर गुन्हा दाखल होतोय. चोराला सोडून सामान्यांना कायदेशीर कचाट्यात अडकवायचं. पोलिसांचा हा कुटील डाव मंत्रालयाच्या कुठल्या मजल्यावर शिजला, याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं”, असं देखील आशिष शेलार यावेळी म्हणाले.

सरकारला स्वत:चं मत आहे का?

“गेल्या वर्षी देखील अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या बाबतीत देखील अशीच घिसाडघाई केली. केवळ एका युवासेनेने पत्र लिहिलं म्हणून मंत्र्यांनी जाहीर केलं आम्ही परीक्षा घेणार नाही. नंतर सर्वोच्च न्यायालयाने सुनावल्यानंतर यांनी परीक्षा घेतल्या आणि आमच्या विद्यार्थ्यांचं भवितव्य सुरक्षित झालं. आता देखील मुंबई उच्च न्यायलयाने फटकारल्यावर दहावीच्या परीक्षांबाबत हे बैठका घेत आहेत. यावर सरकारने शिक्षकांचं मत जाणून घेतलं, विद्यार्थ्यांचं मत जाणून घेतलं. या सरकारला स्वत:चं असं काही मत आहे का?” असा देखील सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.

“मुख्यमंत्री टीव्हीवर येऊन ज्ञान पाजळणार असतील तर कोणीही १ जूननंतर ऐकणार नाही”

दहावी-बारावीबाबत आज जीआर?

दरम्यान, दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत आज दोन जीआर निघणार असल्याचे सूतोवाच आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर टीका करताना केले आहेत. “आज दोन जीआर निघतील. एक दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाच्या बाबतीत आणि दुसरा बारावीच्या परीक्षांच्या बाबतीत. दहावीच्या विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी पद्धती तुम्ही आणू नका. समानतेच्या आधारावर अकरावीचे प्रवेश व्हायला हवेत, अशी ती प्रक्रिया हवी”, असं आशिष शेलार यावेळी म्हणाले.

Story img Loader