ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायलयाने रद्द केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद राज्यात उमटू लागले आहेत. एकीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं असतानाच आता ओबीसींसाठी राजकीय आरक्षण मिळवण्यासाठी भाजपानं आंदोलन सुरू केलं आहे. आज सकाळपासूनच भाजपानं राज्यातल्या विविध भागामध्ये चक्काजाम आंदोलन सुरू केलं आहे. मुंबईतल्या मुलुंड चेकनाक्याजवळ भाजपा आमदार आशिष शेलार यांनी कार्यकर्त्यांसोबत चक्काजाम आंदोलन सुरू केलं असून यावेळी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर परखड शब्दांमध्ये टीका केली आहे. “सर्वोच्च न्यायालयात ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द होणं हे ठाकरे सरकारचं पाप आहे”, असं आशिष शेलार म्हणाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“आम्ही कोणत्याही थरापर्यंत जाऊ”

आंदोलनादरम्यान बोलताना आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. “ओबीसींना मिळालेलं राजकीय आरक्षण फक्त महाविकासआघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेलं आहे. कोर्टाला हवा असलेला इंपेरिकल डाटा त्यांनी दिला नाही. आयोगाची निर्मिती केली नाही. त्यामुळे आरक्षण गेलं. हे राजकीय आरक्षण परत मिळवणं ही भाजपाची घोषणा आहे. त्यासाठी आम्ही कोणत्याही थरापर्यंत जाऊ आणि आरक्षण मिळवून देऊ”, असं आशिष शेलार म्हणाले आहेत.

“सरकारला आरक्षण द्यायचंच नाहीये”

दरम्यान, यावेळी बोलताना आशिष शेलार यांनी राज्य सरकारला ओबीसी समाजाला आरक्षण द्यायचंच नाहीये असा आरोप केला. पदोन्नतीमध्ये आरक्षण देता येणार नसल्याच्या सरकारच्या प्रतिज्ञापत्रावर देखील त्यांनी निशाणा साधला. “राज्य सरकार आणि विशेषत: ठाकरे सरकार यांना ओबीसींनी राजकीय आरक्षण द्यायचंच नाहीये हे पुन्हा एकदा सिद्ध होतंय. कोर्टामध्ये ज्या पद्धतीने राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र दिलं आहे, ते एका अर्थाने ओबीसींच्या आरक्षणाचं मृत्यूपत्रच आहे. शेकडो, हजारो कार्यकर्त्यांना अटक झाली तरी आम्ही स्वत:ला अटक करून घेऊ. ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाशी तडजोड केली जाणार नाही. इम्पेरिकल डाटा देण्यासाठी १५ महिने का लागले? फडणवीस सरकारने काढलेला जीआर व्यपगत का केला? याची उत्तरं सरकारला द्यावी लागतील”, असं ते म्हणाले आहेत.

“मुख्यमंत्री महाराष्ट्राला ‘बंदीराष्ट्र’ बनवू पाहतायत; पुन्हा शहरांना ४ वाजताच टाळं”

काँग्रेस-राष्ट्रवादीचं आंदोलन म्हणजे चोराच्या…!

यावेळी बोलताना आशिष शेलार यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेचा देखील समाचार घेतला. “काँग्रेस-राष्ट्रवादीचं आंदोलन म्हणजे चोराच्या उलट्या बोंबाच आहेत. ओबीसींचं राजकीय आरक्षण या सरकारने संपवलं आहे. ठाकरे सरकारचं हे पाप आहे. हे राजकीय आरक्षण पुन्हा मिळेपर्यंत भाजपाचं आंदोलन दिवसागणिक तीव्र होईल. जनमानसातून मोठी प्रतिक्रिया उमटेल.काँग्रेसचं आंदोलन नौटंकीचा दुसरा प्रकार आहे. या नौटंकीला जनता ओळखते. त्यांनी इम्पेरिकल डाटा गोळा करावा आणि ओबीसीला राजकीय आरक्षण मिळवून द्यावं. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेनं नौटंकी आंदोलन करू नये”, असं आशिष शेलार यावेळी म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mla ashish shelar slams uddhav thackeray government for obc political reservation pmw