धारावीच्या पुनर्विकासाचं काम अदाणी समुहाला दिल्यावरून शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे. “५० खोके कमी पडायला लागले म्हणून मुंबई आणि धारावी गिळायला बोके निघालेले आहेत,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी शिंदे सरकारवर केली होती. आता भाजपा आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे.
‘एक्स’ ( ट्वीटर ) अकाउंटवर आशिष शेलार म्हणाले, “उद्धव ठाकरे म्हणजे यु टर्न… आजपर्यंत त्यांनी ज्या भूमिका घेतल्या, त्यातून प्रत्येक वेळी यु टर्न घेतलेत… आता त्यांनी धारावी पुनर्विकासाला विरोध करणारी भूमिका घेतली आहे. ‘यु टर्न फेम’ श्रीमान उध्दव ठाकरे यांनी आज मोर्चा काढला तोही ‘टि जंक्शन’ वरूनच…”
“कोविडमध्ये बिल्डरांना १२ हजार कोटींचा प्रिमियम कुणी माफ केला?”
“म्हणजे कुठल्याही बाजूला वळायची सोय आहेच! एकदा ‘ठाकरे डिमांड रुपया’ (TDR) त्यांना मिळाला की ‘यु टर्न’ घेण्याचा मार्ग मोकळा! आज म्हणाले, त्यांनी घेतलेला बिल्डर धार्जिणा एक निर्णय दाखवा… बघा घेतला का यु टर्न? कोविडमध्ये बिल्डरांना १२ हजार कोटींचा प्रिमियम कुणी माफ केला? मुंबईकर हो! धारावीकरांचा यांना पुळका जोरात… खोके घेऊन अदाणी कधी जाणार आता ‘मातोश्री’च्या दारात?” असा खोचक प्रश्न शेलारांनी उपस्थित केला आहे.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
“अदाणींची सुपारी घेणाऱ्या दलालांना सांगतो, हा किती मोठा अडकित्ता आहे. तुमची दलाली चेचून ठेचून टाकू की पुन्हा तुम्ही अदाणींची नाव घेणार नाही. ५० खोके कमी पडायला लागले म्हणून मुंबई आणि धारावी गिळायला बोके निघाले आहेत. यांची मस्त वाढत चालली आहे. एकतर हे असंवैधानिक सरकार आहे,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती.
“धारावीतील अपात्र नागरिकांना मिठागरात पाठवणार आहेत”
“करोनाच्या काळात धारावीतील लोकांना पात्र-अपात्र ठरवलं नाही. मग, विकास करताना पात्र अपात्र ठरवणारे तुम्ही कोण? धारावीतील अपात्र नागरिकांना मिठागरात पाठवणार आहेत. अद्यापही मिठागराचा निर्णय झाला नाही. म्हणजे मिठागराची जागा सुद्धा ९९ वर्षांच्या करारावर अदाणींना देणार आहेत. आता ५० ते ५५ हजार लोक पात्र आहेत. तर, लाखांच्यावरती लोक अपात्र आहेत,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
“आमचा विकासाला विरोध नाही”
“धारावीतील नागरिकांना मिठागरात पाठवून त्याचंही पुर्नविकास करण्याचासाठी अडाणींना देण्यात येईल. विकासाच्या नावाखाली सगळंच अदाणींच्या घशात घालण्याचं काम चालू आहे. धारावीकरांना ५०० फूटांचं घर मिळालं पाहिजे. आमचा विकासाला विरोध नाही. धारावीकरांना जिथल्या-तिथे घर मिळाले पाहिजेत. तसेच, रेल्वेलाईनमध्ये अदाणींनी त्याचं घर बांधावे. धारावीकरांचा घर बांधू नये,” असंही उद्धव ठाकरेंनी ठणकावलं आहे.
“‘बीडीडी’चाळीप्रमाणेच धारावीचा विकास सरकारने करावा,” अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी केली आहे.