भाजपा आमदार अतुल भातखळकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार आहेत. भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. परप्रांतीयांची नोंद ठेवावी लागेल, असे वक्तव्य काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल केले होते. काल झालेल्या गृहविभागाच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी याबाबत सुचना केल्या होत्या.
मुंबईमधील समता नगर पोलीस ठाण्यात मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचे देखील अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे. भातखळकर म्हणाले, “परप्रांतीयांची नोंद ठेवण्याचं वक्तव्य म्हणजे दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. यासंदर्भात मी तक्रार दाखल करणार आहे. एका विशिष्ट समाजात द्वेष पसरवणं, भीती पसरवणं हा कायद्याने गुन्हा आहे.”
हेही वाचा – काँग्रेसच्या माडीला शरद पवारांचा टेकू; रावसाहेब दानवेंची जोरदार फटकेबाजी
अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्यावर टीका देखील केली आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले वक्तव्य हे १०० टक्के बेशरमपणाचं, घटनेच्या विरोधी आणि कायद्याचे उल्लंघन करणारे आहे. एका केस संदर्भात चर्चा करत असतांना मुख्यमंत्री म्हणतात परप्रांतीयांवर आम्हाला नरज ठेवावी लागेल, असं म्हणतात. म्हणजे बलात्कार करणाऱ्याचा धर्म कोणता, जात कोणती हे बघून तूम्ही निर्णय घेणार आहात का?, असा प्रश्न भातखळकर यांनी उपस्थित केला.
एबीपी माझाशी बोलताना भातखळकर म्हणाले, “स्वताला कायदा सुव्यवस्था सांभळता येत नाही. मुख्यमंत्री महोदय तुमच्या मांडीला मांडी लावून बलात्कारी मंत्री बसले आहेत. त्यांच्याबाबत काय निर्णय घेणार आहात. ते राज्यातील आहेत की परराज्यातील आहेत. तुमच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांवर आरोप होत आहेत. महिलेने आरोप केले तर तीला तुरंगात टाकलं जात आहे. यावर मुख्यमंत्री काही बोलायला तयार नाही आहेत. शिवसेनेतील अनेक पदाधिकाऱ्यांवर अशाप्रकारचे आरोप आहेत. त्यांची नावे माझ्याकडे आहेत. मग ते काय आता परप्रांतीय आहेत का.”