करोनाचा साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्रात लॉकडाउन लागू आहे. यावेळी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठा बंद असताता. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांच्या मालकीच्या दीडशे एकर जमिनीवर रात्रीच्या अंधारात शेळी आणि बोकडांचा बाजार भरतो, अशी तक्रार भाजपाच्या वतीने उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांना देण्यात आली होती. त्यामुळे राजकारणाला सुरुवात झाली आहे. भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी नवाब मलिक यांच्यावर कणखर शब्दात टीका केली आहे.
अतुल भातखळकर म्हणाले, “संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन असताना उस्मानाबाद जिल्ह्यात मंत्री नवाब मलिक यांच्या मालकीच्या जमिनीवर रात्रीच्या अंधारात शेळी आणि बोकडांचा बाजार भरत असल्याचे समोर आले आहे. रोज सकाळी उठून मोदी सरकारला सल्ला देणाऱ्या नवाब मलिकांना हे काळोखातले बोकड धंदे शोभत नाहीत.”
करोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि प्रशासन करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना राबवीत असल्याचं पहायला मिळत आहे. मात्र, बोकडांच्या बाजारामुळे खळबळ उडाली आहे. उस्मानाबाद भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी नबाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. नबाब मलिक यांच्या दबावामुळे बाजार भरवणारे तसेच अन्य कोणावरही कारवाई करण्यात आली नसल्याचे नितीन काळे यांनी म्हटले आहे.