मुंबई : ऐरोली विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे आमदार गणेश नाईक यांच्या आमदारकीला शिवसेनेचे (ठाकरे गट) उमेदवार मनोहर मढवी यांनीउच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मतदार यादीत घोळ केल्याचा आणि निवडणूक प्रक्रियेचे योग्यरित्या पालन न केल्याचा आरोप याचिकेद्वारे करण्यात आला आहे. याचिकेची दखल घेऊन न्यायालयाने सोमवारी नाईक यांना नोटीस बजावली आणि भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.

ऐरोली विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदार यादीत घोटाळा करण्यात आल्याचा आणि निवडणूक लढविण्यात आल्याचा आरोप करणारी निवडणूक याचिका मढवी यांनी वकील असीम सरोदे आणि श्रीया आवले यांच्यामार्फत उच्च न्यायालयात केली आहे. त्यावरील सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या एकलपीठाने नाईक यांना नोटीस बजावून त्यांना याचिकेत उपस्थित आरोपांबाबत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले.

मतदार यादीत बनावट मतदारांचा भरणा करणे, विरोधात मतदान करणाऱ्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळणे, एकाच नावाचे, वय, घराचा पत्ता असलेल्या व्यक्तींना वेगवेगळे मतदान ओळखपत्र देणे. अशी १९,७९५ बनावट मतदारांची नावे ऐरोली येथील मतदार यादीत समाविष्ट आहेत, अशी लेखी तक्रार अंतिम मतदार यादी तयार होण्याच्या आधीच देण्यात आली होती, त्यानंतरही त्याची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. सतत पाठपुरावा केल्यानंतर केवळ १३२९ बनावट मतदारांची नावे रद्द करण्यात आल्याचा दावा मढवी यांनी याचिकेत केला आहे. यासह निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया व मतमोजणीबाबत पारदर्शकता न ठेवणे, सीसीटीव्ही चित्रिकरण माहिती अधिकारात उपलब्ध न करणे, माहिती मागण्याचा मूलभूत अधिकार निवडणूक आयोगाकडून फेटाळण्यात आल्याचा आरोप मढवी यांनी याचिकेत केला आहे. तसेच, या सगळ्या पार्श्वभूमीवर नाईक यांची आमदारकी बेकायदा ठरवून रद्द करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Story img Loader