मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये (Y B Chavan Centre) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपाचे चाळीसगाव विधानसभेचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या भेटीची जोरदार चर्चा रंगली. यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता आमदार मंगेश चव्हाण यांनी यावर खुलासा केला आहे. त्यांनी शरद पवारांशी भेट झाली नसल्याचं स्पष्ट केलं. तसेच आजपर्यंत मी कधीही पवारांच्या सावलीत उभं राहिलो नाही. यापुढे देखील त्यांच्या सावलीत उभं राहण्याची वेळ येणार नाही, असं मत मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केलं.
मंगेश चव्हाण म्हणाले, “आजवर मी दहा फुटावर देखील शरद पवारांच्या उभे राहिलो नाही. मी त्यांच्या सावलीत आजवर कधीही नाही आणि पुढे देखील उभा राहण्याची गरज नाही. मी इतका मोठा नेता नाही की त्यांची भेट घेईल. आमचे भाजपाचे वरिष्ठ नेते त्यांची भेट घेतील. आम्ही कशाला घेऊ? मी कार्यक्रमाच्या नियोजन पाहायला आलो होतो.”
नेमकं काय घडलं?
विश्व अहिराणी साहित्य संमेलनाचा २२ जानेवारीला कार्यक्रम आहे. या पार्श्वभूमीवर आमदार मंगेश चव्हाण आज (२१ जानेवारी) यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आले होते. हा कार्यक्रम मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडणार आहे. त्यामुळे याचे नियोजन योग्य पद्धतीने झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण हे वाय बी चव्हाण सेंटर येथे आले होते. त्याच वेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि इतर नेतेमंडळी देखील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये उपस्थित होते. त्यामुळे मंगेश चव्हाण आणि शरद पवार यांची गुप्त भेट झाली की काय अशी चर्चा सुरू होती यावर मंगेश चव्हाण यांनी प्रतिक्रिया देत राष्ट्रवादीला टोला लगावला.
हेही वाचा : अमोल कोल्हेंच्या नथुराम गोडसे भूमिकेवरील वादावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
विश्व अहिराणी साहित्य संमेलनाचा उद्या वाय बी चव्हाण येथे होणार आहे. हे संमेलन ऑनलाइन पद्धतीने होणार असून या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार मंगेश चव्हाण आहेत. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन उपस्थित राहणार आहेत. तसेच या संमेलनात अनेक मान्यवर ऑनलाइन पद्धतीने उपस्थित राहणार आहेत.