शिवसेना खासदार संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांची संपत्ती ईडीने जप्त केल्यानंतर भाजपा आमदार नितेश राणे यांनी राऊतांवर हल्ला चढवला आहे. संजय राऊतांना लवकरच अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्या बाजूला शिवभोजन थाळी खाण्यासाठी पाठवलं पाहिजे, असं मत नितेश राणे यांनी व्यक्त केलं. तसेच आता संजय राऊत यांना बाहेर ठेऊन उपयोग नाही, त्यांना लवकर घोड्यावर बसवून तुरुंगात पाठवा, अशी मागणी नितेश राणे यांनी केली. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.
नितेश राणे म्हणाले, “ज्याअर्थी ईडीने संजय राऊत यांची संपत्ती जप्त केली म्हणजे तो गुन्हा सिद्ध झाला आहे. त्यामुळे संजय राऊत यांना लवकरात लवकर अटक करावी अशी माझी मागणी आहे. भ्रष्टाचार सिद्ध झाला आहे. तो भ्रष्टाचार संजय राऊत नावाच्या व्यक्तीने केलाय. पैशाचा गैरवापर केलाय. त्यामुळे त्यांना बाहेर ठेऊन उपयोग नाही. त्यांना लवकरच अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या बाजूला शिवभोजन थाळी खाण्यासाठी पाठवलं पाहिजे.”
“ईडीने संपत्ती जप्त केली याचा सरळसरळ अर्थ संजय राऊत यांनी भ्रष्टाचार केला आहे आणि तो सिद्ध झाला आहे. एकदा भ्रष्टाचार सिद्ध झाला की संजय राऊत यांना बाहेर ठेऊन उपयोग नाही. त्यांना लवकर घोड्यावर बसवून तुरुंगात पाठवलं पाहिजे,” अशी मागणी नितेश राणे यांनी केली.
“कुठली मालमत्ता? आम्ही काय…”
या कारवाईनंतर संजय राऊत म्हणाले, “कुठली मालमत्ता? आम्ही काय मालमत्तावाले लोक आहोत का? २००९ साली आमच्या कष्टाच्या पैशातून घेतलेली ही जागा आणि घर. त्याची आमच्याकडे साधी चौकशी कुणी केली नाही. विचारणा केली नाही. आत्ता मी टीव्हीवर पाहिलं की मालमत्ता जप्त केली.” या कारवाईनंतर संजय राऊतांनी “असत्यमेव जयते” असं सूचक ट्वीट देखील केलं आहे.
“हे काय आर्थिक गैरव्यवहार वगैरे म्हणतात ना, एक रुपया जरी अशा गैरव्यवहारातला आमच्या खात्यात आला असेल आणि त्यातून आम्ही मालमत्ता खरेदी केली असेल, तरी सर्व मालमत्ता आम्ही भाजपाला दान करायला तयार आहोत”, असं आव्हान यावेळी संजय राऊतांनी भाजपाला दिलं आहे.
हेही वाचा : संजय राऊतांवर ईडीची मोठी कारवाई, अलिबागमधील ८ प्लॉट आणि दादरमधील फ्लॅट जप्त!
“राजकीय सूड कोणत्या थराला पोहोचलाय”
“२००९ची मालमत्ता आहे. एक एकरही पूर्ण जागा नाही. आमच्या पत्नीच्या किंवा आमच्या नात्यातल्या लोकांच्या अधिकृत पैशातून घेतलेल्या त्या जागा आहेत. ईडीला आता त्याच्यात आर्थिक गैरव्यवहार दिसायला लागला. राजकीय सूड कोणत्या थराला जाऊन पोहोचलाय, ते तुम्ही पाहिलं असेल”, अशा शब्दांत संजय राऊतांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं.