भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनासंदर्भात केलेलं विधान व्हायरल झाल्यानंतर त्यांनी आपल्या विधानावरून घुमजाव करत सगळं खापर प्रसारमाध्यमांवर फोडलं आहे. आपण असं कोणतंही वक्तव्य केलेलं नसून माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला असल्याचं प्रसाद लाड म्हणाले आहेत. शनिवारी रात्री यासंदर्भालं त्यांचं विधान व्हायरल झाल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या. यावर रात्री उशिरा प्रसाद लाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच, आपल्या विधानामुळे कुणाचं मन दुखावलं असेल, तर त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो, असं देखील ते म्हणाले आहेत.
माझ्या विधानाचा विपर्यास…
भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी रात्री उशिरा आपल्या फेसबुक अकाउंटवरून याविषयीचं स्पष्टीकरण दिलं आहे. “प्रसारमाध्यमांतून माझ्या एका भाषणाचा विपर्यास करून मी शिवसेना भवन फोडणार अशा बातम्या दिसत आहेत. पण मी स्पष्टीकरण देऊ इच्छितो. घाबरण्याचं कोणतंही कारण नाही. जेव्हा आरे ला कारे होईल, तेव्हा कारेला आरेचं उत्तर दिलं जाईल. पण ज्या शिवसेना प्रमुखांवर आम्ही प्रेम करतो. शिवसेना प्रमुखांबद्दल आम्ही आदर ठेवतो. त्या शिवसेनाप्रमुखांच्या शिवसेना भवनाबद्दल माझ्याकडून तरी असं कोणतंही वक्तव्य केलं जाणार नाही”, असं ते म्हणाले आहेत.
माझं असं म्हणणं होतं…
दरम्यान, आपल्याला नेमकं काय म्हणायचं होतं, याबाबत प्रसाद लाड यांनी दावा केला आहे. “माझं असं म्हणणं होतं की आम्ही माहीममध्ये जेव्हा येतो, तेव्हा एवढा बंदोबस्त ठेवला जातो, की जणूकाही आम्ही शिवसेना भवनच फोडायला जाणार आहोत. त्या बातमीचा विपर्यास करून जे काही दाखवण्यात आलं आहे, त्यावर माझं हे स्पष्टीकरण आहे. मला कोणत्याही प्रकारे शिवसेना प्रमुख आणि शिवसेना प्रमुखांनी बांधलेल्या वास्तूचा अनादर करायचा नव्हता”, असं प्रसाद लाड यांनी नमूद केलं आहे.
…तर त्याबद्दल दिलगिरी!
दरम्यान, आपल्या विधानाबद्दल प्रसाद लाड यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. “जर मी कुणाचं मन दुखावलं असेल, तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो”, असं ते म्हणाले आहेत. मात्र, यासोबतच, आपल्या व्हिडीओमध्ये घाबरण्याचं कोणतंही कारण नाही. जेव्हा आरे ला कारे होईल, तेव्हा कारेला आरेचं उत्तर दिलं जाईल असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.
कुठे, कधी आणि कुणासमोर केलं हे विधान? वाचा सविस्तर
नेमकं काय म्हणाले होते प्रसाद लाड?
“भाजपाची ताकद काय आहे हे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत आपण दाखवून दिलं होतं. कारण, त्यावेळी जी भाजपा होती, भाजपाला मानणारा कार्यकर्ता विचाराचा जो मतदार होता. तो मतदार आज देखील भाजपा बरोबर आहे आणि आता तर सोने पे सुहागा हुआ है…कारण नारायण राणे व राणे कुटुंबीयांना मानणारा देखील खूप मोठास्वाभिमानीचा गट भाजपामध्ये आला आहे. त्यामुळे भाजपाची ताकद ही निश्चितच दुप्पट झाली आहे. नितेशची पुढच्या वेळी आपण थोडे कार्यकर्ते कमीच आणू, कारण आपण आलो की पोलिसच खूप येतात. फक्त त्यांना सांगायचं की वर्दी घालून पाठवू नका म्हणजे आपल्या हॉलमध्ये बसायला उपयोग होईल. कारण एवढी भीती तुमची आमची की त्यांना असं वाटतं की हे माहीममध्ये आले म्हणजे सेना भवन फोडणारच, काही घाबरू नका वेळ आली तर ते देखील करू”, असं प्रसाद लाड म्हणाले होते.