शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. याच दौऱ्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सडकून टीका केली. याला प्रत्युत्तर म्हणून ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी बावनकुळेंना ‘बावनखुळे’ असं म्हणत टीका केली. आता सावंत यांच्या टीकेला भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर देत एकेरी उल्लेख करत कपडे फाडण्याचा इशारा दिला आहे.
प्रसाद लाड म्हणाले, “काल परवापर्यंत घरी बसलेले झोपी गेलेले जागे झाले आहेत आणि दौऱ्यावर निघाले. अशा परिस्थितीत उकळत्या पाण्याला खळखळाट फार अशी परिस्थिती अरविंद सावंत यांची झाली आहे. त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर बोलताना तोंड सांभाळून बोलावं. त्यांचा खुळखुळा झाला आहे. काल ते पोपट मेला, पोपट मेला असं म्हणत होते. तो त्यांचाच ‘बॉस’ नावाचा पोपट मरायला आला आहे. म्हणून तो घरातून बाहेर पडला आहे.”
“अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना घरातून बाहेर पडले नाही, मानेला पट्टे लावून फिरले”
“अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना ते कधी घरातून बाहेर पडले नाहीत. जनतेला भेटले नाहीत. मानेला पट्टे लावून फिरले आणि आता ते आम्हाला सांगतात की, आम्ही बाहेर पडलो आणि चंद्रशेखर बावनकुळे खुळे आहेत,” अशी टीका प्रसाद लाड यांनी केली.
व्हिडीओ पाहा :
“…तर त्यांचा एकेरी उल्लेख करून कपडे फाडणार”
“मी अरविंद सावंतांना एक सांगतो की, चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्राचे नेते आहेत. ते महाराष्ट्र भाजपाचं नेतृत्व करत आहेत. अरविंद सावंतांना मी परत परत साहेब म्हणतो आहे. मात्र, त्यांनी यापुढे अशी चूक केली, तर त्यांचा एकेरी उल्लेख करून त्यांचे कपडे फाडल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, एवढंच सांगतो,” असा जाहीर इशारा लाड यांनी सावंत यांना दिला.